scorecardresearch

चिकनचे दर २०० रुपये पार

हवामान बदलामुळे कोंबडय़ांच्या खाद्यामध्ये घटक असणाऱ्या सोयाबीन व मक्याचे दर वाढल्याने कुक्कुट पालन केंद्रात तयार होणाऱ्या ब्रॉयलर चिकनच्या उत्पादन दरामध्ये वाढ झाली आहे.

कोंबडय़ांचे खाद्य महागल्यामुळे, ग्राहकांसह व्यावसायिक हवालदिल

नीरज राऊत

पालघर : हवामान बदलामुळे कोंबडय़ांच्या खाद्यामध्ये घटक असणाऱ्या सोयाबीन व मक्याचे दर वाढल्याने कुक्कुट पालन केंद्रात तयार होणाऱ्या ब्रॉयलर चिकनच्या उत्पादन दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी किरकोळ बाजारपेठेत चिकनचे दर २०० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचले असून होळीच्या काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. कोंबडय़ांसाठी प्रति ३० रुपयांनी किलोने मिळणारे खाद्य ४२ रुपयांवर येऊन पोहोचले आहे. 

पंधरवडय़ापूर्वी वसई तालुक्यातील अर्नाळा येथे बर्ड फ्लूची लागण झाली होती. मात्र पशुसंवर्धन विभागाने कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना तातडीने राबवल्याने  आजाराचा प्रसार झाला नाही. बर्ड फ्लू नियंत्रणात ठेवल्याबद्दल राज्य सरकारने जिल्हा पशुसंवर्धन विभागाची प्रशंसा केली असतानादेखील किरकोळ बाजारात कोंबडय़ांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.

कोंबडय़ांच्या खाद्यामध्ये ७० टक्के घटक असणाऱ्या मक्याचे दर १६ रुपयांवरून २३ रुपयांवर वाढले असून उर्वरित खाद्यामध्ये घटक असणारी सोयाबीन तीन महिन्यांत ३५-३६ रुपयांवरून तब्बल ७२ रुपये प्रति किलो इतक्या दराने उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे ३० रुपये प्रति किलोने मिळणारे पोल्ट्री खाद्य ४२ वर पोहोचले आहे.  सरासरी दोन किलो ग्रॅम वजनाची कोंबडी कुक्कुटपालन केंद्रात चार किलो खाद्य सेवन करत असून  खाद्य तसेच कोंबडीचे पिल्लू मिळण्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने केंद्रामध्ये उत्पादित होणाऱ्या कोंबडीचा खर्च ८५ रुपयांवरून १०० रुपयांच्या पुढे गेले आहे.

केंद्रामधून किरकोळ नफा घेऊन कोंबडय़ांची विक्री केल्यास त्याची वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना किमान १५ रुपये व किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला २५ रुपये इतके नफ्याची तरतूद केल्याने जिवंत कोंबडी १५० रुपये तर कोंबडी कापल्यानंतर त्यामधून निघणारे सुमारे ७० टक्के खाण्यायोग्य मांस २०० रुपये प्रति किलो इतक्या दराने विकले जात आहे. ग्रामीण भागात किरकोळ विक्रीचे दर २५०  रुपयांच्या जवळपास पोहोचली असून होळीच्या हंगामात कोंबडीच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्याचे नवीन पिके येईपर्यंत दर कायम

मका व सोयाबीनचे नवीन पीक येत्या सप्टेंबर महिन्यात बाजारात विक्रीसाठी येण्याचे अपेक्षित असून तोपर्यंत कोंबडय़ांच्या खाद्यांच्या दरांमध्ये विशेष घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोंबडीचे दर बाजारामध्ये २०० रुपयांच्या जवळपासच  मिळतील  अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढीव दर तसेच उष्णतेच्या हंगामात वेगवेगळय़ा आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता अनेक केंद्र चालकांनी आपले कुक्कुटपालन केंद्र बंद ठेवण्याचे पसंत केले आहे. जिल्ह्यातील सुमारे २०० लहान-मोठय़ा केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्र बंद असल्याने  पक्ष्यांचा पुरवठा मर्यादित राहिल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

उष्णता रोखण्यासाठी प्रयत्न

मार्च महिन्यापासून वातावरणातील उष्णता वाढत असल्याने कोंबडीला वेगवेगळय़ा आजारांची लागण होत असते. हे टाळण्यासाठी अनेक कुक्कुटपालन केंद्रचालकांनी  उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याची स्प्रिंकलर व पंखे लावून हवा खेळती ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chicken prices cross food confusion consumersysh