पालघर: पालघर तालुक्यातील खडकोली या गावात चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. तर पाच नागरिकांना तापाची लागण असून त्यातील काहींना हा आजार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
खडकोली गावामध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर लक्षणे आढळलेल्या इतर जणांचे नमुने घेऊन ते नमुने डहाणूच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे तेथून अहवाल आल्यानंतरच त्यांना चिकुनगुनिया आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. मात्र या अहवालाची वाट न बघता या रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आलेले आहेत. या भागांमध्ये अनेक घरात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळय़ा व परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यानंतर या ठिकाणी डास अळय़ांवर प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला धूर फवारणी व औषध फवारणीच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावातील अनेकांना तापाची लागण झाली असून अनेकांना अंगदुखीसारख्या लक्षणांना सुरुवात झाली होती. यातील एका रुग्णाच्या तपासणी अहवालात तो चिकनगुनियाने बाधित असल्याचे समजले. खडकोली गावात १०२३ लोकसंख्या असून २०७ घरे आहेत. आरोग्य विभागाने संपूर्ण गाव साथ उद्रेक म्हणून घोषित केला आहे. कीटकजन्य आजार जाहीर केल्यामुळे या गावात सतर्कतेचा इशारा आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.
हा आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभाग व पथकामार्फत दररोज पाहणी करून उपाययोजना करीत आहोत. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये.-डॉ. अभिजीत खंदारे , तालुका आरोग्य अधिकारी, पालघर