पालघरमध्ये अमलीपदार्थ सहजपणे उपलब्ध

पालघर : पालघरमधील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या प्रमुख शहरी भागांसह ग्रामीण भागांतही अमलीपदार्थ सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे ही तरुण पिढी स्वस्त व हानिकारक व्यसनाधीनतेकडे वळताना दिसत आहेत. यामुळे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईमधील महाविद्यलायीन तरुणांचा धुम्रपान, अमलीपदार्थ सेवनाकडे कल आता पालघरमधील तरुणांमध्येही हळूहळू रुजत चालला आहे. मुंबईहून पालघरमधील काही खासगी व उच्च दर्जाच्या महाविद्यालयात शिकण्यासाठी येणारे तरुण येथील तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यास भाग पडत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागांतील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील महाविद्यालयीन तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. पालघर, बोईसर, डहाणू अशा मोठ्या शहरांमध्ये लहान-सहान पानटपरीवरून स्वस्त व शरीराला हानिकारक अमलीपदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे तरुणवर्गाचा मोठा ओढा या व्यसनांकडे आहे. सहजरीत्या या पानटपरीवरून हे अमलीपदार्थ उपलब्ध होत असले तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

लहान-लहान दुकाने, पानटपरी येथून अमलीपदार्थ सेवनाचे नवनवीन प्रकार दर महिन्याला येत आहेत. हुक्का, त्यातील विविध सुगंधी तंबाखूमिश्रित पावडर व नशायुक्त मँगो पावडर, धूम्रपट्टी तर काही ठिकाणी गांजा व राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. हे व्यसनी जिन्नस विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

अलीकडेच कागदी पट्टी बाजारात नव्याने दाखल झाली आहे. या कागदी पट्टीमध्ये विविध अमली पदार्थ टाकून ते ओढण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ही पट्टी गुंडाळून त्यामध्ये निर्माण झालेल्या पोकळीत गांजा किंवा तंबाखू टाकून ती सिगारेटसदृश बनवून ओढली जात असल्याचे विविध ठिकाणी दिसत आहे. या नवीन प्रकाराच्या बरोबरीने चॉकलेटच्या गोळीसारखी दिसणारी व खिशाला परवडणारी अशी नशाकारक भांगेची मँगो गोळी घेण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे. या गोळीला मँगो पावडरही पर्याय ठरत आहे. पालघर शहरात पूर्वेकडील भागात व्यसनांचे नाना प्रकार विकणाऱ्याची टोळी सक्रिय आहे.

अनेक देवळा या परिसरात पोलिसांनी धाड टाकून हे प्रकार थांबवण्यासाठी पावले उचलली असली तरी चोरट्या मार्गाने ही विक्री आजही सुरूच आहे. बोईसर परिसरातही अशा मोठ्या टोळ्या सक्रिय असून चित्रालय परिसरामध्ये बुटका गांजा या पदार्थाचे गोदामच असल्याचे दिसून येते. या टोळ्यांचे पोलिसांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे तसेच लहानसहान पानटपरी यांचेही आर्थिक हितसंबंध असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप केले जात आहेत.

पालघरमधील एका पानटपरीवाल्याकडून पोलिसांना सुमारे दोन ते तीन हजार रुपये हप्ता दिला जातो असे एका पानटपरीवाल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे या पानटपरीवाल्यांचे मोठे फावले आहे व राजरोसपणे ते विविध व्यसनांची साधने विकत आहेत. तरुण वर्गही या व्यसनांकडे फॅशन म्हणून पाहत असला तरी त्यामुळे तो आपोआपच व्यसनांच्या आहारी जात आहे. हे प्रकार थांबावे व सामाजिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक व्यसन मुक्ती केंद्रांमध्ये पालघरमधील तरुण व्यसनमुक्तीसाठी जाताना दिसत आहेत. याचबरोबरीने व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे कुटुंब या तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

व्यसनमुक्ती शिबिरे कागदावरच

शासनामार्फत व्यसनमुक्ती शिबिरे, तंबाखूमुक्त शाळा-महाविद्यालय असे अनेक उपक्रम राबवण्यास सांगितले असले तरी हे सर्व कागदावरच आहे. याचबरोबरीने पालकांमध्ये जनजागृती, तरुणांमध्ये व्यसन प्रतिबंधात्मक जनजागृती, समुपदेशन केंद्रे, व्यसनमुक्ती केंद्रे महाविद्यालय, विद्यालय, तालुका स्तरावर असणे आवश्यक असले तरी अशी केंद्रे नाहीत.

तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हे प्रकार थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तरुण पिढीची मोठी हानी होईल यात शंका नाही. – डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ  नये यासाठी मोहिमा आखून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जातील. तरुणांच्या समुपदेशनासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेऊन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. – प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर