निखील मेस्त्री
पालघर : महिला बालविकास विभागाच्या प्रशासकीय उदासीनतेमुळे सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना अजूनही सेवा निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. पालघर जिल्ह्यत १७० पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाचा सेवानिवृत्तीचा लाभ थकीत आहे. या महिन्यात हा लाभ न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

अंगणवाडी सेविका यांची सेवा २० वर्षां पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सेवा ३० वर्षांंपर्यंत ग्रा धरली जाते.  २००७ मध्ये राज्य शासनाने सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी शासन निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी सेविकांना त्यांच्या प्राप्त प्रस्तावानुसार निवृत्ती पश्चात एक लाख रुपये तर मदतनीस यांना ७५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे. २०१५ पर्यंत शासनाने सेवानिवृत्ती पैसे जीवन विमा मंडळाकडे वर्ग केले असले तरी त्यानंतर अजून पर्यंत सेवानिवृत्ती लाभासाठीचे भरले जाणारे पैसे मंडळाकडे जमा केलेले नाहीत.

या सेवानिवृत्ती लाभासाठी राज्य शासनाच्या महिला बाल विकास आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत जीवन विमा मंडळ यांच्याशी करार केलेला आहे. मात्र राज्य शासन मंडळाला पैसे देत नसल्यामुळे सेवानिवृत्ती धारकांना त्यांचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. २ ऑक्टोबर पर्यंत हा लाभ न मिळाल्यास सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचारी सामूहिक आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहेत. तसा इशाराही राज्य शासनाला देण्यात येणार असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव राजेश सिंग यांनी सांगितले आहे.

दरम्यान, केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे कर्मचारी लाभापासून वंचित आहेत. ताबडतोब पाठपुरावा करून त्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, असे आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी म्हटले आहे.

शासनाच्या दुर्लक्षपणाचा फटका कर्मचाऱ्यांनी का सोसावा? संघर्ष करून हा हक्क घ्यावा लागणार आहे, असे अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष  एम. ए पाटील यांनी सांगितले आहे.

काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यतील प्रस्ताव प्रलंबित आहेत. आयुक्त कार्यालयात या प्रस्तावांची पूर्तता करून लवकरात लवकर सेवानिवृत्तीचा लाभ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-प्रवीण भावसार, महिला व बालविकास अधिकारी, पालघर