पालघर: पश्चिम रेल्वेने मुंबई-सुरत दरम्यानच्या विभागात रेल्वे रुळाच्या दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार डहाणू रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला सुमारे २०-२२ किलोमीटर रुळाच्या पश्चिमेच्या बाजूला भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीवर जाण्यासाठीचा रस्ता बंद होणार आहे.
पश्चिम रेल्वेने त्यांच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण कमी व्हावे तसेच वहिवाट रस्ता म्हणून वापर होऊ नये म्हणून सिमेंट काँक्रीट भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सलगपणे भिंतीची उभारणी झाल्याने डहाणू मसोली गावातील गट क्रमांक ५७ सह आंबेमोरा, मसोली व वाकी या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्याचा मार्ग बंद होणार आहे. पूर्वी हे शेतकरी रेल्वे लाइनच्या लगत असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून प्रवास करीत असत. या भागात ३५ कुटुंबांमधील २६५ प्रौढ तर सुमारे २०० शालेय विद्यार्थी निवास करीत असून त्यांना आपल्या दिनक्रमात डहाणू भागात जाण्यासाठी पक्का रस्ता उरलेला नाही. शिवाय या भागात वैद्यकीय गरज भासल्यास रुग्णवाहिका किंवा अन्य कोणतेही वाहन येण्याचा रस्ता बंद होणार असल्याने येथील नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करून ही गंभीर बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपला संरक्षण भिंतीला विरोध नसून भिंतीलगत वहिवाटीसाठी रस्ता देण्यात द्यावा, अशी मागणी डहाणूच्या उत्तरेकडील ग्रामस्थांनी केली आहे.