scorecardresearch

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार जण जखमी; पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमटा गावाच्या हद्दीमध्ये काल रात्री भरधाव ट्रकने समोर बंद पडलेल्या ट्रकला जोरात धडक दिली.

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमटा गावाच्या हद्दीमध्ये काल रात्री भरधाव ट्रकने समोर बंद पडलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये बंद पडलेल्या ट्रकजवळ सेवा बजावत असलेल्या महामार्ग पोलिसांचे दोन आणि आयआरबी कंपनीचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे ३ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारा एक ट्रक बंद पडला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे अपघात होऊ नये यासाठी ट्रकजवळ मागील वाहनांना सावध करून मार्गिका बदलण्यास सांगण्यासाठी महामार्ग पोलिसांचे सचिन धानिवरे (पो.ह.), मधुकर गोदाले (पो.ह.) व आयआरबी कंपनीचे अमित क्रिश्न व शौकत शेख हे कर्मचारी काम करत होते. रात्रीच्या वेळी अचानक दुसरा ट्रक गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. समोर ट्रक उभा असल्याने अपघात होऊ नये म्हणून पोलीस व आयआरबीचे कर्मचारी सदर ट्रकचालकाला सावध करून थांबण्यास सांगत होते, परंतु ट्रकचालकाला झोप लागली असल्याने त्याने त्याच वेगाने चारही कर्मचाऱ्यांना आणि उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली.
या गंभीर अपघातात पोलीस हवालदार सचिन धानिवरे व मधुकर गोदाले यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या पायाचा चुरा झाला आहे. तर आयआरबी कंपनीचा कर्मचारी शौकत याने जीव वाचवण्यासाठी पुलावरून खाली उडी मारल्याने त्याच्याही पायाला दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. भरधाव ट्रक चालवणाऱ्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four injured national highway accident including police irb personnel amy

ताज्या बातम्या