उधवा गावातील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

तलासरी तालुक्यातील उधवा गाव आणि बाजारपेठतील कचरा मुख्य रस्त्यावर टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कासा : तलासरी तालुक्यातील उधवा गाव आणि बाजारपेठतील कचरा मुख्य रस्त्यावर टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खानवेल-उधवा आणि रहदारीच्या रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नागरिक आणि ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाक बंद करून तोंडावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे.

उधवा गाव आणि बाजारपेठतील कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या गंभीर झाली आहे. याकडे ग्रामपंचायतही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत असून अशावेळी घरातील कचरा कुणाला द्यावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आता घरातील कचरा रस्त्यांवर येऊ  लागला आहे. परिणामी खानवेल-उधवा रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे जमा झाले असून सुंदर गाव विद्रुप होत आहे.

 ग्रामपंचायत कचरा उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याचे नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. कचरा साचला की तो पेटवला जात आहे. त्याचबरोबर आता रस्त्यावरचा कचरा कडेला सरकवा आणि कडेचा कचरा नाल्यात किंवा रस्त्याच्या खालच्या बाजूला ढकला, असा मार्ग अवलंबला जात आहे. विशेषत: गावाच्या हद्दीलगत ही पद्धत अवलंबली जात असून, त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. ही पद्धती बदलली नाही तर दिवसेंदिवस आरोग्याचे प्रश्न गंभीर रूप धारण करतील.

उधवा बाजारपेठेपासून काही अंतरावर असलेल्या खानवेल-उधवा रस्त्यावर आणि गावच्या हद्दीलगत कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता खूपच जास्त आहे. खानवेल उधवा, उधवा तलासरी अशा बहुतांश भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजतो, सडतो आणि तेथेच साचून राहतो. त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच ढीग साचतात. याबाबत उधवा ग्रामपंचायतीला विचारणा केली असता ग्रामपंचयतीकडे डम्पिंग ग्राऊंड लहान असून काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जात नाही. त्यामुळे इतरत्र कचरा टाकला जात असल्याचे सांगितले.

नागरिकांच्या तक्रारींची दखल नाही

उधवा गाव आणि बाजारपेठतील हा कचरा रोज उचलला जात नाही. काही ठिकाणी तर तो कधीच उचलला जात नाही. त्यामुळे नागरिक कचरा खानवेल- उधवा रस्त्यावर फेकून देतात. रस्त्यावरील कचरा रस्त्याच्या कडेला सारला जातो. आणि कडेचा कचरा रस्त्याच्या खाली ढकलला जातो. बाजूला नाला, ओढा, चर असेल तर कचरा त्यात टाकला जातो. तो तेथेच साचून राहतो. तेथेच तो कुजतो आणि परिसरात दुर्गंधी पसरते. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रासदायक ठरतो. तेथे राहणाऱ्यांसाठी तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे.  त्या भागातील नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही.

डम्पिंग ग्राउंड लहान असून त्या ठिकाणी कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केल्याने कचरा विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी येतात. डम्पिंगसाठी दुसरीकडे जागेचा शोध सुरू आहे.

नीलेश तांडेल, ग्रामसेवक, उधवा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Garbage kingdom streets udhwa village ysh

Next Story
पालघर शहरात उद्योगांमुळे जलप्रदूषण
ताज्या बातम्या