scorecardresearch

बेकायदा खासगी रुग्णालय बंद; भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे पालघर नगरपरिषदेची कारवाई

पालघरमधील बेकायदा खासगी रुग्णालयावर पालघर नगर परिषदेने कारवाई केली आहे.

बेकायदा खासगी रुग्णालय बंद; भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे पालघर नगरपरिषदेची कारवाई
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पालघर: पालघरमधील बेकायदा खासगी रुग्णालयावर पालघर नगर परिषदेने कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतीच्या तळमजल्यावर हे रुग्णालय सुरू होते. दोन वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये करोना केअर सेंटर चालविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेत खासगी रुग्णालयातून उपचार सुविधा बेकायदा देण्यात येत होत्या. इमारतीचे बांधकाम सुरू असताना हे रुग्णालय सुरू ठेवून रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत होता. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. रुग्णालयाला अग्नी व विद्युत लेखापरीक्षण नाही. परवानगी न घेता अंतर्गत संरचनेत बदल केले गेले होते. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने वारंवार प्रसिद्ध केले होते. 

नगर परिषदेने अनेक वेळा रुग्णालय बंद करण्यासाठी इमारत मालकाला नोटिसा पाठवलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही हे रुग्णालय सुरूच ठेवण्यात आले होते. अलीकडेच हे रुग्णालय बेकायदा असल्याने रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी सूचना नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी महावितरणला पत्राद्वारे केली होती. त्यानंतरही वीजपुरवठा खंडित केला नव्हता.

 राज्य मानवी हक्क आयोगाने हे प्रकरण सुमोटोअंतर्गत प्राधान्याने घेऊन खटला सुरू केला होता. या रुग्णालयातून उपचार घेऊ नयेत असे आयोगाने सांगितल्यानंतर नगर परिषदेने हे प्रकरण गांभीर्याने घेत हे रुग्णालय अनधिकृत असून या रुग्णालयातून उपचार घेऊ नयेत तसेच ते नगर परिषदेमार्फत शुक्रवारपासून बंद करण्यात येणार असल्याने रुग्णांनी इतरत्र उपचार घ्यावेत असे सूचनाफलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. दरम्यान, करोनाकाळामध्ये या रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. शासकीय दरापेक्षा जास्त दराने उपचार केल्यामुळे अनेक रुग्णांचे अतिरिक्त पैसे परत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने या खासगी रुग्णालय प्रशासनाला दिल्या होत्या. रुग्णालयाने रुग्णांचे पैसे परत दिले की नाही, याबाबत अजूनही कळू शकलेले नाही.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या