चार वर्षांपासून काम बंद; रस्त्यांची दुरवस्था
वाडा: वाडा शहरातील कैलास सिनेमागृह ते हनुमान मंदिर व मस्जिद नाका ते राम मंदिर हे दोन रस्ते नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम या दोन विभागाच्या कात्रीत अडकले आहेत. त्यामुळे मंजूर रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू झालेले नाही. सद्या या दोनही रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्यावर वाहने चालविणे अवघड झाले आहे.
वाडा शहरातील मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणारा कैलास सिनेमागृह ते हनुमान मंदिर हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर वाहनचालकांकडून याच पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येतो.
तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी चार वर्षांपूर्वी चार कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांच्या कडून या कामासाठी त्या वेळी निविदा प्रक्रियाही पूर्ण करून हे काम एका ठेकेदाराला देण्यात आले.
या रस्त्याबरोबरच शहरातील मस्जिद नाका ते राम मंदिर या रस्त्यासाठी दोन कोटी दोन लाख रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया राबवून एका ठेकेदाराला काम देण्यात आले.
या दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया राबविली असतानादेखील गेल्या चार वर्षांत या रस्त्याच्या दोन्ही कामांना प्रत्यक्षात आजपर्यंत सुरुवात झाली नाही.
या कामांबाबत अधिक चौकशी केली असता, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येऊ नयेत असा आदेश बांधकाम विभागाकडून आल्याने या कामांचा कार्यारंभ आदेश रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
सद्या या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने चालविण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहनांचे नुकसान होत आहेच, पण दुचाकी स्वारांचे नेहमीच अपघात होऊन जखमी होत आहेत.
जनतेची परवड
गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम नगरपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन विभागाच्या वादात अडकल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यावरुनच वाहनचालक, प्रवासी, ग्रामस्थांना जावे लागत असून या वादात त्यांचे मात्र हाल होत आहेत.
या रस्त्यांची निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश दिले होते ही वस्तुस्थिती खरी आहे, मात्र त्याच वेळी या शहराला नगरपंचायत दर्जा दिल्याने कार्यारंभ आदेश रद्द करावे लागले. -अनिल भरसट , विभागीय उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा.