करोनापूर्व काळात मराठीतील मुख्य मनोरंजन वाहिन्यांवरच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात होते. पुढे तितके चांगले मराठी चित्रपट नाहीत, त्यांना प्रेक्षक नाहीत म्हणून हे प्रमाण कमी होत गेले. सध्या सुरू असलेल्या काही निवडक स्वतंत्र चित्रपट वाहिन्या वगळता नवे मराठी चित्रपट चित्रपटगृहांव्यतिरिक्त कुठे पाहण्याची संधी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर नवेझ्र्जुने मराठी चित्रपट घरच्या घरी पाहण्याची पर्वणी देणारी ‘प्रवाह पिक्चर’ ही ‘डिस्ने स्टार’ समूहाची नवी मराठी चित्रपट वाहिनी महिन्याभरापूर्वी दाखल झाली आहे. इतर कुठल्याही वाहिनीवर दाखवला न गेलेला नवीन मराठी चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या या वाहिनीवर १९ जूनला पहिल्यांदाच ‘पावनिखड’ चित्रपटाचा वल्र्ड प्रीमिअर होणार आहे. यानिमित्ताने, मराठी चित्रपट वाहिन्या किती गरजेच्या आहेत? त्यांना प्रेक्षकवर्ग आहे का?, याविषयी वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्याशी केलेली बातचीत..

’ ‘प्रवाह पिक्चर’ ही स्वतंत्र मराठी चित्रपट वाहिनी सुरू करण्यामागचा उद्देश काय होता?
चित्रपट लहान असो वा मोठा तो एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला की पुढच्या तीन दिवसांत त्याचे भविष्य ठरते. तो चांगला चालला तर लोकांना थोडय़ाच दिवसांत एकतर ओटीटी वाहिन्यांवर किंवा उपग्रह वाहिन्यांवर पाहायला मिळतो. मराठी चित्रपट मात्र चित्रपटगृहाबाहेर पाहण्याची संधी क्वचितच मिळते. सध्या मोठय़ा संख्येने मराठी चित्रपटांची निर्मिती होते आहे. ते सगळेच चित्रपट दूरचित्रवाहिन्यांवर पाहायला मिळत नाहीत. मराठी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेला मोठा प्रेक्षकवर्ग आहे, पण त्याला ती संधी उपलब्ध नाही. निश्चितपणे मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून मागणी आहे, मग त्यांना ते द्यायलाच हवेत, या उद्देशाने ‘प्रवाह पिक्चर’ ही स्वतंत्र मराठी चित्रपट वाहिनी सुरू करण्यात आली आहे.

’ करोनापूर्व काळात ‘स्टार प्रवाह’ या मुख्य वाहिनीवरही नवीन मराठी चित्रपटांचे वल्र्ड प्रीमिअर दाखवले जायचे. मग ते बंद का केले गेले?
गेल्या दोन वर्षांच्या काळात सगळीच चक्रे बंद पडली होती. काहीच नवीन घडत नव्हते. मुळात जे सुरू आहे त्याला प्रतिसाद मिळेल का?, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे चित्रपट दाखवणे बंद केले गेले असे म्हणता येणार नाही, पण काही काळ थोडे थांबून मग अंदाज घेऊन नवी सुरुवात केली. आता सगळय़ा गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. प्रेक्षकांनी ‘पावनिखड’, ‘झिम्मा’, ‘शेर शिवराज’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा सगळय़ाच प्रकारच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला. यापैकी काहीच चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळाले. मात्र अजूनही खूप मोठय़ा संख्येने असे प्रेक्षक आहेत जे सहज चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत, हे आमच्या अभ्यासातून लक्षात आले, ही एक गोष्ट. आणि दुसरे म्हणजे ‘स्टार प्रवाह’ ही महाराष्ट्रात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेली पहिल्या क्रमांकाची मनोरंजन वाहिनी ठरली आहे. मग त्याच यशस्वी वाहिनीच्या प्रेक्षकांना स्वतंत्र चित्रपट वाहिनी का देऊ नये?, या विचारातून आम्ही ‘प्रवाह पिक्चर’ची मुहूर्तमेढ रोवली.

’ सध्या अगदी मुख्य धारेतील नसल्या तरी ‘शेमारु बाणा’, ‘फक्त मराठी’ अशा आठ ते दहा मराठी चित्रपट वाहिन्या सुरू आहेत. यात ‘प्रवाह पिक्चर’ ही वाहिनी वेगळी कशी ठरेल?
सध्या विविध मराठी चित्रपट वाहिन्यांवर मराठी चित्रपट उपलब्ध आहेत. ‘प्रवाह पिक्चर’वरही वेगवेगळे जुने मराठी चित्रपट गेल्या महिन्याभरात प्रेक्षकांनी पाहिले आहेत. अगदी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिवसभर त्यांचे गाजलेले चित्रपट ‘प्रवाह पिक्चर’ वाहिनीवर आम्ही दाखवले. त्यामुळे मराठीतील आत्तापर्यंतचे गाजलेले चित्रपट इथे पाहायला मिळणार आहेतच, शिवाय आम्ही दर रविवारी एका नव्या मराठी चित्रपटाचा वल्र्ड प्रीमिअर करणार आहोत. इतर कोणत्याही उपग्रह वाहिनीवर याआधी दाखवला गेला नाही असा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांना ‘प्रवाह पिक्चर’वर पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात ‘पावनिखड’ने होणार आहे. मग ‘झिम्मा’, अशोक सराफ यांचा ‘प्रवास’, स्वप्निल जोशी अभिनित ‘बळी’, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून नावाजलेला ‘कारखानीसांची वारी’ असे सगळय़ा शैलीतील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

’ स्वतंत्र मराठी चित्रपट वाहिनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना येणारी आव्हाने कोणकोणती आहेत?
एका मोठय़ा समूहाचा भाग म्हणून स्वतंत्र नवी मराठी चित्रपट वाहिनी सुरू करणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूप मोठे आव्हान आहे. यासाठी खूप वेगेवगळय़ा स्तरावर एक मोठा चमू काम करत आहे. वाहिनीची प्रसिद्धी, वितरण झ्र् विपणन यासाठीची ध्येयधोरणे आखणे, जाहिराती मिळवणे, वाहिनीसाठी योग्य चित्रपट कोणते ते पाहून त्याची निवड करणे, निर्मात्यांशी योग्य पद्धतीने चर्चा-व्यवहार करून चित्रपट वाहिनीकडे आणणे, आलेल्या चित्रपटांची विभागवारी अशी खूप पातळय़ांवर काम करणारी मंडळी आहेत. या सगळय़ा मंडळींच्या मदतीने ‘प्रवाह पिक्चर’ पुढे न्यायची आहे. पहिली किमान दोन वर्ष तरी या सगळय़ा मूळ प्रक्रिया आणि ध्येयधोरणे ठरवण्यासाठी लागली आहेत.

’ मराठी चित्रपट वाहिन्यांना प्रेक्षक आहेत का?
मराठी चित्रपटांना आता खूप उत्तम बाजारपेठ उपलब्ध आहे. करोनाकाळात जे चित्रपट प्रदर्शितच होऊ शकले नव्हते, मागे पडले होते ते आता एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले. ते पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात आले, त्यांना मिळालेल्या यशामुळे ते आपसूकच मोठे झाले. ‘झिम्मा’ काय, ‘पावनिखड’ काय किंवा ‘चंद्रमुखी’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या सगळय़ाच मराठी चित्रपटांचे विषय मोठे होते, त्यांची व्याप्ती मोठी होती, धाटणी वेगवेगळी होती. या चित्रपटांनीच आपली बाजारपेठ मोठी केली आहे. त्यामुळे साहजिकच मराठी चित्रपट उद्योगात एक ऊर्जा संचारली, प्रेक्षकही आनंदी झाला. त्याला मराठी चित्रपट आवर्जून पाहावेसे वाटत आहेत. मराठी चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात दृढ नाते निर्माण झाले आहे.

’ ओटीटी माध्यम लोकप्रिय असताना चित्रपट उपग्रह वाहिन्यांना प्रतिसाद मिळेल का?
‘प्रवाह पिक्चर’चे घोषवाक्यच आहे ‘चला पिक्चरला जाऊ या’. चित्रपट हे एकच माध्यम असे आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणते. आज कुठे जाऊ या?, या प्रश्नाला अगदी सहजपणे चला आज पिक्चरला जाऊ या असे म्हणत एकाच कुटुंबातील सगळी मंडळी बाहेर पडतात. एकत्र चित्रपट पाहण्याचा आनंद लुटतात. ओटीटीवर वैयक्तिक चित्रपट पाहण्याची सोय आहेच की.. त्यापलीकडे चांगला वेळ घालवण्यासाठी सगळय़ा कुटुंबाला कुठेही घराबाहेर न पडता, कुठलेही अवघडलेपण नसलेला निखळ, मनोरंजक, कौटुंबिक आशय एकत्र पाहायला मिळणे हेच याचे वैशिष्टय़ ठरणार आहे.

(मुलाखत : रेश्मा राईकवार)