कासा : जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून कासा येथे उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे खरे, परंतु येथे तज्ज्ञ डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल कायमच आहेत.
कासा उपजिल्हा रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण उपचारांसाठी येत असतात, परंतु तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नाहीत. अनेकदा गंभीर अवस्थेतील रुग्णांवरही प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयाबाहेर उपचारांसाठी पाठवले जाते. रुग्णांना नाइलाजाने वापी, सिल्वासा, वलसाड, ठाणे, मुंबई येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला माफक दरात आणि उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयासारख्या रुग्णालयांचे नियोजन शासनाकडून केले जाते. या रुग्णालयासाठी २००५ मध्ये शासनाने दोन कोटी खर्च केले होते. तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली तसेच रुग्णांसाठी अद्ययावत यंत्रसामग्री दिली. सुरुवातीला हे सगळे नीट सुरू होते, पण नवी नवलाई ओसरल्यानंतर येथे कुरबुरी सुरू झाल्या.
गेली अनेक वर्षे कासा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त आहे. येथे सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ तीन पदेच भरली असून चार रिक्त आहेत. या उपजिल्हा रुग्णालयात एकूण ४६ पदांना मंजुरी आहे, परंतु त्यातील १०-१२ पदे रिक्त आहेत. अगदी हृदयरोगतज्ज्ञ, शल्यक्रियातज्ज्ञ आदी महत्त्वाची पदेही रिक्त आहेत. ३ कक्ष सेवक, ३ बाह्य रुग्णसेवक आणि ३ सफाई कामगार अशी पदे कंत्राटी तत्त्वावर भरती केली आहेत. तब्बल ५० खाटांचे हे रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने केवळ प्रथमोपचार केंद्र बनले आहे. येथे सोनोग्राफी, क्ष किरण विभाग, अद्ययावत प्रयोगशाळा आदी आधुनिक तपासणी यंत्रणा उपलब्ध आहेत, पण त्या हाताळण्यासाठी योग्य आणि तज्ज्ञ कर्मचारीच नाहीत. त्यामुळे या यंत्रणा असून नसल्यातच जमा आहेत.
कासा उपजिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत नियमित ओपीडीमध्ये १००-११० रुग्ण तपासले जात आहेत. वैद्यकीय अधिकारी कमी आहेत, परंतु त्यासाठी मागणी केली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय होते आहे. त्यात लवकरच सुधारणा करणार आहोत. – डॉ.प्रदीप धोडी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कासा