पालघर : पालघर लोकसभा जागेसंदर्भात महायुतीमधील भाजप व शिवसेनेतील तिढा सुटला नसल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. तरीदेखील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक नेतेमंडळींच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवसेनेमधून निवडून आलेल्या राजेंद्र गावित हे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पालघरची जागा शिवसेनेकडे राखून ठेवण्यात येते की भाजप या जागेवर दावा करतो याबाबत अनिश्चितता आहे. गावित यांच्याविषयी महायुती पक्षातील नेते मंडळी व नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीबाबत अहवाल वरिष्ठांकडे प्राप्त झाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा लांबणीवर पडली आहे, असे सांगण्यात येते.

हेही वाचा…बहुजन विकास आघाडीमुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार

गावित यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याऐवजी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणे सोयीचे असल्याचे वसई येथे माध्यमांना सांगितले होते. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. पालघरची उमेदवारी जाहीर होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात पाच वर्षे खासदारकी उपभोगलेल्या गावित यांनी केलेल्या कामांची माहिती मतदारसंघात द्यावी असे शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी त्यांना सुचवल्याचे सांगण्यात येते. त्या अनुषंगाने त्यांनी वसई व डहाणू तालुक्यातील डहाणू, चिंचणी, वाणगाव परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

संघटनांना भेटी देण्यावर भर

राजेंद्र गावित यांनी सध्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेट घेऊन आपल्याकरिता उमेदवारी व पुढे निवडणुकीत मदत करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी पालघर जिल्ह्यातील १६-१७ आदिवासी संघटना लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एकत्रित बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात आपण सहभागी होऊ असे राजेंद्र गावित यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. विविध पक्षांची ध्येयधोरणे वेगळी असली तरी आदिवासी समाजासोबत आपण नेहमीच राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…पालघर मध्ये बविआ निवडणूक लढवणार, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

उद्धव ठाकरे यांची सभा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सभा शुक्रवारी सायंकाळी बोईसरजवळील पास्थळ येथे आयोजित करण्यात आली आहे. एकीकडे महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसताना महाविकास आघाडीने मात्र थेट आपल्या प्रमुख नेत्याच्या जाहीर प्रचारसभेने निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे.