नितीन बोंबाडे

वीटभट्टी मालकांकडून बेकायदा खोदकाम; सूर्या नदीचे पाणी यंदाही मानवी वस्तीत शिरण्याची भीती

डहाणू : वीटभट्टी मालकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वीटनिर्मितीत लागणाऱ्या मातीसाठी सूर्या नदीवर बेकायदा खोदकाम केले जात आहे. त्यामुळे किनारा खचत चालला असून नदीचा प्रवाह बदलून तो लगत असलेल्या गावाच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा सामना या गावांना करावा लागत आहे.  मात्र प्रशासकीय पातळीवर यावर प्रतिबंधक उपाय केले जात नसल्याने यंदाही पुराचे संकट कायम असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

सूर्या नदीच्या किनाऱ्यावर मनोर भागात  ५० हून अधिक वीटभट्टय़ा सुरू आहेत. वीटभट्टी मालकांकडून  किनाऱ्यावरील भागातच वीटभट्टीसाठी  माती खणण्याचे प्रकार सुरू आहे.  सूर्या नदीच्या किनारी सुमारे ५० कुटुंबे असलेले काटेलपाडा गाव वसले आहे.    मुसळधार पावसाळ्यात पूर आल्यानंतर नदीचा पाण्याचा प्रवाह या भल्यामोठय़ा पोखरलेल्या भगदाडीमधून शिरत आहे. हा प्रवाह नजीकच्या नैसर्गिक टेकडय़ांवर आदळून तो दुर्वेस, काटेलपाडा या गावांच्या दिशेने जात असल्याने दरवर्षी या गावांना आलेल्या संकटाचा सामना करावा लागतो. पुराचा प्रवाह आदळत असल्याने येथील टेकडीला धोका निर्माण झाला आहे. तसेच काही अंतरावर असलेला पॉवरग्रिडचा पिलर कोसळण्याच्या स्थितीत आला आहे.  दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामुळे किनारी  असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात  पाणी साचत आहे. त्यामुळे भातपिकाची लावणी करण्यास अडचण निर्माण होते. अतिवृष्टी झाली तर गावात पाणी शिरून  नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची भीतीही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. मात्र, प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.

गाव पाण्याखाली जाण्याची भीती

चक्रीवादळामध्ये पडलेल्या मुसळधार पावसात  नदीला पूर आला होता.  त्या वेळी गावात पाणी घुसले होते. या वर्षी अतिवृष्टी झाल्यास संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.   खोदकामामुळे किनारा पोखरला जाऊन नदीचे पात्र विस्तारत आहे. त्यामुळे पुरामध्ये काटेलपाडा गावात  पाणी घुसण्याचा धोका यंदाही कायम असून ग्रामस्थांमध्ये चिंता आहे.

नदी किनाऱ्यावर माती उत्खनन करण्यास आम्ही परवानगी देत नाही. तरी ज्या भागात असे प्रकार घडले आहेत. त्याची पाहणी करून  कारवाई केली जाईल.

– संदीप म्हात्रे, मंडळ अधिकारी, मनोर

वीटभट्टी व्यवसायांमुळे नदी किनारा खोदला जात असून  पाण्याचा प्रवाह बदलून गावाच्या दिशेने आला आहे. मुसळधार पावसात नदी पुराचा गावांना धोका हा आहेच. त्याचप्रमाणे वीजभट्टय़ांसाठी होणाऱ्या जड वाहतुकीमुळे  गावाच्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.

– चंदू काटेला, ग्रामस्थ काटेलपाडा, दुर्वेस