कासा : वारंवार गायब होणारी वीज, अवाच्या सवा वीज देयके, पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा, अचानक कापले जाणारे मीटर अशा अनेक प्रकारांमुळे महावितरणच्या कारभारावर तलासरी तालुक्यातील नागरिक रुष्ट आहेत.
तलासरी तालुक्यात वीजविषयक अनेक समस्या सुरू आहेत. वीज वितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार याला जबाबदार आहे. कमी दाबाने विद्युतपुरवठा होण्याची समस्या तर नेहमीचीच आहे. अचानक कमी-जास्त होणाऱ्या विद्युत दाबामुळे वीजेवरील अनेक उपकरणे चालत नाहीत किंवा बिघडतात. वीज देयकांसंबंधी तर नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. गावखेडय़ांत मीटर रीडिंगशिवायच वाट्टेल ते देयक आकारणी केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला. त्याचप्रमाणे वीज देयकांचे वाटप वेळेत केले जात नाही. त्यामुळे मग वीज देयके भरण्याची तारीख थोडी जरी पुढे गेली तरी थेट मीटर कापले जातात. त्याचबरोबर मीटर रीडिंगशिवायच अनेक वीज देयके तयार होत असल्याचा गंभीर प्रकार नागरिकांनी कथन केला. नवीन मीटर आणि वीजजोडणी लवकर होत नाही. महावितरणच्या या अशा अंदाधुंद कारभारामुळे तलासरीतील आदिवासी जनता, व्यापारी तसेच शासकीय यंत्रणाही हैराण झाली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी, लहान मोठे दुकानदार, शासकीय कार्यालये, बँका, ग्रामीण रुग्णालय, मुला-मुलीचे वसतीगृह, शाळा-कॉलेज, पेट्रोलपंप या सगळय़ांचीच अनेक दैनंदिन कामे वीजेच्या लपंडावामुळे खोळंबून राहतात.
दुसरीकडे वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून तालुक्यात थकबाकी वसुली सुरू आहे. त्यामुळे वीज देयके न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी व मीटर पूर्वसूचनेविनाच कापले जात याहेत.
संपूर्ण तालुक्यात केबल लाइनची सोय करण्यात यावी, नव्याने मंजूर झालेली कामे सुरू करावी. मीटर रीडिंगनुसार वीज देयके द्यावी, मागेल त्याला नवे वीज मीटर द्यावे, कापलेले घरगुती वीज मीटर लाभार्थ्यांना परत करावेत. तालुक्यातील सर्व गावपाडय़ांमध्ये सर्वेक्षणे करून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करावेत तसेच दुरवस्थेतील विजेच्या खांबांची दुरुस्ती, जुनी देयके माफ करावी आदी मागण्या ग्रामस्थ करत आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.
वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. आमच्या मीटरचे फोटोच न काढता महावितरण अवाच्या सवा बिल आकारत आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवायच महावितरण वीज मीटर काढून नेतात. – संतोष वळवी, स्थानिक ग्रामस्थ