पावसाळ्यात संपर्कहीन; पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची प्रतीक्षाच

कासा: मोखाडा तालुक्यापासून ३५ ते ४० किलोमीटर अंतरावरील डोंगर कपारीमधील आसे ग्रामपंचायती अंतर्गत गुजरातच्या सीमेवर वसलेला कोल्हेधव आदिवासीपाडा आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. कमी लोकसंख्या असल्याचे कारण पुढे करून येथे सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने कोल्हेधववासीयांचा पावसाळ्यात यंदाही संपर्क तुटणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या पाडय़ांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गावाची अशी गत कायम आहे. कोल्हेधव हा पाडा समस्यांनी ग्रासलेला असून राज्याच्या मुख्य धारेपासून तुटलेला आहे. येथ वीज, पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाहीत. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून त्यास रुग्णाला न्यावे लागते. पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर अनेक दिवस या पाडय़ाचा संपर्क उर्वरित भागाशी व तालुक्याशी होत नाही. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘घरघर बिजली’ अशा योजनांचा या डय़ाला स्पर्श देखील झाला नाही.

एखादी व्यक्ती आजारी पडल्यास लाकडाची डोली करून ६ ते ७ किमीचा डोंगर पार करून आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने पार्वती गावित (वय ३२) या गरोदर महिलेचे बाळ दगावले आहे. त्याचबरोबर निवृता गावित ही गरोदर व बाळ दगावल्याचे लोक सांगतात. तर पावसाळ्यात नदीच्या पलीकडे ये-जा करताना लाशा गावित नावाची व्यक्ती नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. जीव मुठीत धरून मरण यातना भोगणाऱ्या या आदिवासींकडे प्रशासन लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.

आसे या गावापासून कोल्हेधव हा पाडा १६ ते १७ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यावर करोळी ते कुडवापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात पाहायला गेले तर डांबरीकरण कमी आणि अनेक ठिकाणी या १० किमीच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डेच पडल्याचे चित्र पाहायला मिळत होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या रस्त्याचे सुधारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोल्हेधवला जाणारा उर्वरित ७ ते ८ किमीचा रस्ता पूर्णत: डोंगर माथ्याची पायवाट तुडवत पूर्ण करावा लागतो हे चित्र कायम आहे. या संदर्भात मोखाडा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त होणे टाळले.

या पाडय़ाला पाणी साठवण्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. पण हे साठवून ठेवलेले पाणी एक महिनाच पुरते. त्यानंतर मात्र इथल्या लोकांना आठ महिने ४ किमीचा डोंगर पार करून नदीतील खड्डय़ांमधून पाणी भरून आणावे लागते आणि प्यावे लागते. या पाडय़ावर अद्यापही विजेचा पुरवठा होत नाहीये. एका संस्थेने सौर ऊर्जेवरील दिवे दिले होते पण ते फार दिवस चाललेले नाहीत.

स्वस्त धान्यासाठी ७ किमी पायपीट

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वास्तव्यास असलेल्या ५० लोकवस्तीच्या कोल्हेधव या आदिवासी पाडय़ावर अंगणवाडी नाही, शाळा नाही, पाण्याची सोय नाही, एवढेच काय रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी ७ किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना नावळ्याचा पाडा गाठावा लागतो. त्यातही एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी ४ ते ५ वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळ्यात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने चार महिन्यांचे धान्य आणता येत नाही, असे येथील ग्रामस्थ हिरामण गावित यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्याची सोय नसल्याने पावसाळ्यात येथील आदिवासींचा संपर्कच तुटतो.