पालघर : झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या पालघर तालुक्यातील १९ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या तीन आठवडय़ांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पर्यायी पाणीपुरवठय़ाची अद्याप व्यवस्था केली गेलेली नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीचे काम मुळात एप्रिल महिन्यापासून हाती घेण्याचे पाटबंधारे विभागाकडून जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेने पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पर्यायी व्यवस्था अजूनही कार्यरत झालेली नाही, त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन तीन आठवडे उलटल्या नंतर देखील ही १९ गावे तहानलेली आहेत.
बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी झंझरोळी धरणाशी संलग्न असलेल्या या गावांतील सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांची पाणीपुरवठा नियोजन करण्यासाठी एक बैठक सफाळे येथे बोलावली होती. राजेश पाटील आणि सफाळे उपसरपंच राजेश म्हात्रे यांच्या मार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. गावांतील ग्रामस्थांना व्यवस्थित पाणीपुरवठा केला जावा यासाठी पाटील यांनी पालघर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर सर्व संबंधित गावांतील सरपंच यांच्यासह झांझरोळी धरणावर पाहणी केली. यावेळी तत्काळ मोटरपंप आणि पाईपची व्यवस्था करून सर्व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. धरणातील पाणी उपसा करण्यासाठी तरंगत्या प्रणालीवर पंप बसवण्यासाठी उच्चदाब विद्युत जोडणे आवश्यक असून जोडणी उपलब्ध करून देण्यास वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी जिल्हा परिषद २५ ते ४० लाख रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात येते.
मोटर पंपाद्वारे पाणीपुरवठय़ाची मागणी
धरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पालघर तालुक्यातील १९ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुरुस्तीचे काम होईपर्यंत मोटर पंपाद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली आहे. ऐन उन्हाळय़ात धरणाच्या दुरूस्ती दरम्यान पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यास अपयशी झाल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
डिझेल पंपाच्या पद्धतीने धरणांमधील उपलब्ध पाण्याचा उपसा करून सिंचन विहिरीपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात येत आहे. यासाठी एचडीपीई पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसात हंगामी व्यवस्था कार्यरत होईल.-वैदेही वाढाण, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर