पालघर: भगदाड पडलेल्या झांजरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जिल्हा परिषदेने योजिलेली हंगामी व्यवस्था काही दिवसांपूर्वी कार्यान्वित झाली आहे. आता पाणी साठा करणाऱ्या सिंचन विहिरीतील गाळ काढण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दुरुस्ती दरम्यान बंद असलेल्या त्या १७ गावांचा पाणीपुरवठा लवकरच म्हणजे शनिवारपासून सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.
झांजरोली धरणामध्ये ८ जानेवारी रोजी भगदाड पडल्याचे निदर्शनास आले होते. या धरणांमधील पाण्याची पातळी कमी करून एप्रिलच्या मध्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेची पर्यायी व्यवस्था सुरू होऊ न शकल्याने १७ गावातील सुमारे सव्वा ते दीड लाख लोकांना उन्हाळय़ात तहानलेले राहावे लागले होते.
तरंगणाऱ्या प्रणालीवर पंप बसवून पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कार्यन्वित झाली आहे. असे असले तरी त्याकरिता विद्युत प्रवाह उपलब्ध नसल्याने जनित्रच्या (जनरेटर) माध्यमातून हे पंप चालवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा योजनेत पाणी सोडण्यापूर्वी हंगामी साठा करणाऱ्या सिंचन विहिरीमध्ये साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. तो गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात हे काम लांबल्यामुळे केळवे, माहीम, माकुणसार, आगरवाडी, विलंगी, भादवे, कोरे, दातिवरे आदी १७ गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागले होते. आता सिंचन विहिरीतील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकरच म्हणजे शनिवारपासून पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.
खोलवर गाळामुळे कामास विलंब
सिंचन विहिरीमध्ये असलेल्या गाळामुळे गढूळ पाणीपुरवठा होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गाळ काढण्याचे काम हाती घेतले. मात्र प्रत्यक्षात गाळ हे २० ते २५ फूट खोल असल्याने गाळ काढण्याचे काम लांबल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. गाळ काढण्याचे काम जलद गतीने करण्यासाठी हायड्रा मशीनची मदत घेण्यात येत असून ते काम पूर्ण झाल्यानंतर हंगामी पाणीपुरवठा घेऊन व्यवस्थेतून झांजरोली नळ पाणी योजनेतील गावांना ४ जूनपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले.