उत्पल व. बा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील विविध विचारप्रवाह पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथे मनुष्य आणि सृष्टीच्या नात्याचा खोलवर विचार झाला आहे. भारतीय इतिहासाला जातीय विभाजनाचा मोठा विवादास्पद पैलू आहे. परंपरेचा अभिमान बाळगणारे बरेच जण या पैलूकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतात..

गेल्या नऊ लेखांमधून ‘परंपरा आणि नवता’ हे मध्यवर्ती सूत्र धरून आपण काही विषयांवर प्रामुख्याने संकल्पनात्मक चर्चा केली आहे. मला असं वाटतं की जेव्हा कुणी वैचारिक स्वरूपाचं काही लेखन करतं तेव्हा त्या लेखनाचा एक मुख्य उद्देश लिहिणाऱ्याने स्वत:चं आकलन वाढवणं हा असायला हवा. वैचारिक लेखन हे मुख्यत्वे संकल्पनांचा, विचारकलहांचा, व्यवस्थात्मक उत्तरांचा धांडोळा घेणारं असतं. त्यात एक प्रभाव हा ‘पस्र्पेक्टिव्ह’चाही असतो. विशिष्ट दृष्टिकोन तिथे प्रभावी असू शकतो. त्यामुळे आपण ‘अंतिम सत्य’ मांडतोय असा लेखकाचा आग्रह नसावा. मानवनिर्मित जग अचंबित करणारं आहे. मौजेचं आहे. कारुण्याचं आहे. दु:खाचं आहे. विवादांचं आहे. या जगाचं आपलं आकलन, आपल्या ‘नव्या जगाच्या कल्पना’ मांडायची स्पेस लेखकाला मिळायला हवीच, फक्त वर म्हटलं तसं लेखकाचा एक हेतू स्वत:ची समज वाढवणं हाही असायला हवा.

ही लेखमाला लिहिण्याच्या प्रक्रियेमधून हा उद्देश पूर्ण होतो आहे, याचं मला समाधान आहे. कधी कधी असाही विचार मनात येतो की आपण उंटावरून शेळ्या हाकतोय का? पण वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात, ‘वाचून काही तरी नवीन मिळालं’ असं कळवतात तेव्हा बरं वाटतं. अर्थात वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांबरोबरच इतरांच्या न दिल्या गेलेल्या नकारात्मक प्रतिक्रियाही असू शकतात याची जाणीव मनात जागी असते. ‘परंपरा आणि नवता’ याबाबत भारतीय संदर्भात चर्चा अधिक टोकदार होते याचं कारण भारतीय समाजव्यवस्थेच्या रचनेत आहे. ही रचना एकसंध नाही आणि त्याच्या परिणामी, या रचनेचं उत्पादन असलेला भारतीय माणूसही शतखंड आहे. भारत एकाच वेळी सोळाव्या आणि एकविसाव्या शतकात वावरत असतो, असं म्हटलं जातं ते खरंच आहे. अमर्त्य सेन यांचं ‘आग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’ नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक मी वाचलेलं नाही, पण हे शीर्षक मला ‘भारतीयत्वा’च्या एका लक्षणाचं अचूक वर्णन करणारं वाटतं. हे आग्र्युमेंटचं जनुक इथल्या सर्व प्रकारच्या वैविध्यांमुळे विकसित झालं आहे आणि एका अर्थी ते उपकारक आहे, पण दुसऱ्या बाजूने नवतेला अटकाव करणारंही आहे. भारतीय उदारमतवादावर आज, विशेषत: राजकीय परिप्रेक्ष्यातून, बरीच टीका होते आहे. (याचा यथायोग्य शोध स्वतंत्रपणे घेता येईल. या लेखमालेत पुढे तो घ्यावा असं माझ्या मनात आहे.) परंतु आपण साधारण निरीक्षण केलं तर असं दिसेल की प्रबोधनाचा, बदलाचा विचार रुजायला भारतीय मातीत थोडा वेळच लागतो. इथली गुंतागुंत ‘युनिक’ स्वरूपाची आहे. त्यामुळेच परंपरा आणि आधुनिकता या संकल्पनांना भारतीय संदर्भात, विविध परिप्रेक्ष्यात काय अर्थ प्राप्त होतो हे तपासावं लागतं.

या लेखमालेचा पहिला एकतृतीयांश टप्पा संपत असताना उजळणी म्हणून हे मांडावंसं वाटलं. विशेषत: ‘पुरोगामी’ या शब्दाभोवती गेल्या काही वर्षांत जे नकारात्मक वर्तुळ तयार झालेलं दिसतं त्या पाश्र्वभूमीवर आधुनिकतेच्या आग्रहाबरोबरच आधुनिकतेची चिकित्सा करत राहणंही गरजेचं आहे. एखादा विचार स्वतंत्रपणे आकर्षक असतो, पण त्याच्याकडे ‘विथ रेफरन्स टू रिअ‍ॅलिटी’ पाहिलं की चित्र वेगळं दिसतं.

हे सगळं नोंदवून आता पुढे जाऊ.

मागील लेखात आपण नातेसंबंधांविषयी थोडं बोललो होतो. आता नात्यांच्या नव्या रचनेबाबत, प्रारूपाबाबत बोलू या. स्वत:ची भावनिक साक्षरता तपासत राहणं, त्यात सुधारणा करत राहणं ही निरोगी नात्यांची पूर्वअट तर आहेच. दुसरं असं की व्यक्तिस्वातंत्र्य आणि नात्यांमध्ये अपरिहार्यपणे येणाऱ्या अपेक्षा, त्यातून निर्माण होणारी बंधनं याचा समतोल साधण्याची कला अवगत करून घेणं आवश्यक आहे. भारतीयसंदर्भात एक गोष्ट अधोरेखित करायला हवी. ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ किंवा मुळात ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा ऊहापोह करणं शक्य असलं (आणि तो व्हावा) तरी आपली व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या बरीच अलीकडे थांबते. नात्यांमधलं ‘एक्स्प्लोरेशन’ – शोध – याला आपण सहसा तयार नसतो. ‘टिकवणं चांगलं – बदलणं वाईट’ अशी आपली साधारण समजूत आहे. याबाबत किमान ‘थॉट एक्सपेरिमेंट’ करावा असंही फारसं कुणाला वाटत नाही. त्यातून आहे त्या व्यवस्थेचं गौरवीकरण होऊ लागतं. ती पवित्र वगैरेसुद्धा होते. याचं एक कारण आपल्या भक्कम कुटुंबसंस्थेत आणि तीतून आकारास आलेल्या घट्ट मानसिकतेत आहे. नवं स्वीकारताना पारखून स्वीकारावं याबाबत दुमत नाही, पण नवं समोर आलं की गडबडून जाणं म्हणजे शक्यतांचा विचार केलेला नसणं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो ‘जीवनकौशल्यां’च्या शिक्षणाशी जोडलेला आहे. ‘विविध शक्यता असू शकतात’ हा विचारच मनात रुजवला न जाणं तसं गंभीर आहे. इथे पुन्हा एकदा चित्रपट आठवला. रॉबिन विल्यम्स या महान अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला ‘मिसेस डाउटफायर’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल.

घटस्फोटानंतर आपल्या मुलांना भेटण्यासाठी स्त्रीवेश धारण करून बायकोच्या घरी बेबीसीटर म्हणून डॅनियल (रॉबिन विल्यम्स) दाखल होतो. पुढे बऱ्याच गमतीजमती घडतात. शेवटी सत्य उघडकीस आल्यानंतर मुलांच्या आईच्या – मिरांडाच्या (सॅली फील्ड) हे लक्षात येतं की डॅनियल आणि मुलं एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत. मुलांची कस्टडी तिच्याकडे असते. त्यात बदल करायला ती तयार होते आणि डॅनियल त्याच्या मूळ रूपातच मुलांना भेटायला रोज येऊ लागतो. डॅनियल आणि मिरांडा घटस्फोटितच राहतात. चित्रपटाच्या शेवटी डॅनियलचा एक मोनोलॉग आहे. तो आता एक टीव्ही शो करतो आहे. एका घटस्फोटित दाम्पत्याच्या मुलीने लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना तो म्हणतो की, कुटुंबाचे विविध प्रकार असू शकतात. विविध व्यवस्थांनी कुटुंब तयार होऊ शकतं आणि या सर्व व्यवस्थांमध्ये कुटुंबातील प्रेम टिकू शकतं. मला हा मोनोलॉग फार आवडला. डॅनियल-मिरांडामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे घडतं ते घडतंच, पण अखेरीस ‘ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि सुखाने संसार करू लागले’ असं होत नाही. ते वेगळेच राहतात. आपण आता वेगळं राहणं श्रेयस्कर आहे हे त्यांना समजलेलं असतं. या वेगळ्या राहण्यातही मुलांची व्यवस्था नीट लागते. त्या दोघांमधला संवादही सुरू राहतो. आता हे चित्रपटातील कल्पनाचित्र आहे हे बरोबर, पण किमान कल्पनेत तरी काही नवीन घडतं आहे याचं मला समाधान वाटलं.

याच चित्रपटाचा हिंदी रीमेक ‘चाची ४२०’ या नावाने आला होता. कमल हासनसारख्या ताकदवान अभिनेत्याने यात प्रमुख भूमिका केली होती. दिग्दर्शकही तोच होता. पण चित्रपट ‘मिसेस डाउटफायर’ची उंची अजिबात गाठू शकला नव्हता. कमल हासनने स्त्रीवेश घेतल्यावर त्याचा घरमालक आणि सासरा त्याच्याकडे आकृष्ट होणं हे तर अतिशय टिपिकल होतं आणि आपल्या मानसिकतेचं द्योतकही होतं. चित्रपट बऱ्याच ठिकाणी बटबटीत होता. अखेरीस अपेक्षेप्रमाणे नवरा-बायको एकत्र येतात आणि सुखाने संसार करू लागतात हे होतंच. ‘मिसेस डाउटफायर’ आणि ‘चाची ४२०’ हे मानसिकतेतील फरकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. ‘बीइंग इंडियन’मध्ये काही गोष्टी अनुस्यूत असल्यासारख्या धरल्या जातात. त्याची गरज आहे का असा प्रश्न पडतो. हा जो मोल्ड तयार झाला आहे तो आपण ब्रेक का करू शकत नाही? मी मागे काही चर्चामधून मांडलेला मुद्दा इथेही मांडतो. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील विविध विचारप्रवाह पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथे मनुष्य आणि सृष्टीच्या नात्याचा खोलवर विचार झाला आहे. भारतीय इतिहासाला जातीय विभाजनाचा मोठा विवादास्पद पैलू आहे. परंपरेचा अभिमान बाळगणारे बरेच जण या पैलूकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतात. परंतु हे मान्य केलं तरी भारतीय तत्त्वज्ञानात वैचारिक खाद्य पुष्कळ आहे हेही खरं. मला असं दिसतं की आपण या वैचारिक बैठकीकडे, तात्त्विक संघर्षांकडे दुर्लक्ष करतो आणि आपली परंपरा लग्न-कुटुंबसंस्था-जातिव्यवस्था यांच्या भक्कमपणापुरती मर्यादित ठेवतो. (ज्या लेखामुळे र. धों. कव्र्यावर पहिला खटला भरला गेला त्या लेखात (व्यभिचाराचा प्रश्न) त्यांनी हिंदू परंपरेतील दाखले देऊन स्त्री-पुरुष संबंधात आता अनैतिक ठरवल्या गेलेल्या कृत्यांना एके काळी मान्यता होती हे दाखवून दिलं आहे. महाभारत, कामसूत्र यांचा आधार घेत ते हे मांडतात.) मुद्दा असा की आपण जर आपल्या वैचारिक परंपरेचा आधार घेतला तर कुटुंब, नातेसंबंध याबाबत प्रयोग करणं, त्यातील नवतेला सामोरं जाणं आपल्याला जड जाणार नाही. कुटुंबसंस्था भक्कम असणं, मानवी नात्यांमध्ये ओलावा असणं आवश्यकच आहे. हे मुळातच इथे असल्याने आपल्याला बिचकून जायचं काही कारण नाही. पण दिसतं असं की आपण थोडे बिचकतो आणि ज्यांची कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे असा आपला दावा असतो ते पाश्चिमात्त्य मात्र प्रत्यक्षात नव्या रचनेचा स्वीकार (कल्पनेत तरी नक्कीच)करताना दिसतात.  या मुद्दय़ापाशी थांबू आणि पुढील लेखात यावर अधिक सविस्तरपणे बोलू.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व परंपरा आणि नवता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accept the possibilities
First published on: 26-05-2018 at 06:50 IST