
दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

गुरुवारी १४ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

केजीएफ २ या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. तमिळ, तेलुगूसह या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननंही बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे.

केजीएफ २ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २६८.६३ कोटींची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या कमाईने बाहुबली २ या चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने जागतिक पातळीवर ७५० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

केजीएफ २ हा करोना काळानंतर ८ दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी गुरुवारी १४ एप्रिल ५३.९५ कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून या चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या चित्रपटाने १५ एप्रिल – ४५.५० कोटी, १६ एप्रिल – ४०.५० कोटी, १७ एप्रिल – ५०.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

त्यानंतर १८ एप्रिल- २५.५७ कोटी, १९ एप्रिल – १९ कोटी, २० एप्रिल – १६ कोटी कमवले होते. त्यानंतर गुरुवारी २१ एप्रिल रोजी १३.२५ कोटी रुपये कमाई केली आहे.

गेल्या आठ दिवसात या चित्रपटाच्या कमाईत घट होत असली तरी या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवून आहे.

प्रशांत नील यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं इतर भाषांमध्येही चांगलं प्रदर्शन केलं आहे. तब्बल ४ हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.