
सध्या हिंदी चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे देशभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरूद्ध बॉलिवूड असा वाद सुरू आहे.

पण बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जे आज बॉलिवूड प्रसिद्ध कलाकारांमध्ये गणले जातात.

फार कमी लोकांना माहीत आहे की, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं.

तेलुगू चित्रपट Vamsa Vruksham हा त्यांचा १९८० मध्ये आलेला पहिला चित्रपट होता. दरम्यान त्याआधी त्यांनी ‘हमारे तुम्हारे’ या हिंदी चित्रपटात काम केलं होतं.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा २००२ मध्ये ‘हमराज’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार होती. मात्र काही कारणानं तिला या चित्रपटातून बाहेर करण्यात आलं.

त्यानंतर त्याच वर्षी प्रियांकानं Thamizhan या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आज प्रियांका हॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकताना दिसत आहे.

‘एम एस धोनी’ चित्रपटात आपली निरागसता आणि गोड हास्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या दिशा पाटनीनं तेलुगू चित्रपट ‘लोफर’मधून करिअरची सुरुवात केला होती.

दिशा पाटनीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्यानंतर ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण तिनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण दाक्षिणात्य चित्रपटातून केलं आहे.

दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट ‘ऐश्वर्या’ कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.

बॉलिवूडच्या एकेकाळच्या फिमेल सुपरस्टार श्रीदेवी यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.

मात्र त्यांनी करिअरची सुरुवात १९६७ मध्ये तमिळ चित्रपट Kandhan Karunai मधून केली होती. त्यावेळी श्रीदेवी केवळ ४ वर्षांच्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच अभिनेता शाहरुख खानसोबत राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

तापसीनं तिच्या करिअरची सुरुवात २०१० साली तेलुगू चित्रपट Jhummandi Naadam मधून केली होती. त्यानंतर तिने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा जन्मच एका दाक्षिणात्य कुटुंबात झाला आहे. त्या १ वर्षाच्या असताना त्यांनी तेलुगू चित्रपटात काम केलं होतं.

तेलुगू चित्रपट Inti Guttu हा रेखा यांचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट होता. त्यानंतरही त्यांनी बऱ्याच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला चित्रपट मणिरत्नम यांचा Iruvar हा होता. त्यानंतर तिने तमिळ चित्रपट ‘जीन्स’मध्ये काम केलं.

दाक्षिणात्य चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्यानं नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आज ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉननं आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २०१४ साली तेलुगू चित्रपटातून केला होता. आज बॉलिवूडमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्री इलियाना डिक्रुझनंही तमिळ चित्रपट Kedi मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.