-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
गेल्या तीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता लवकरच अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
अरूंधतीने आशुतोषबरोबर लग्न करण्याचा निर्णय देशमुखांना सांगितल्यानंतर या निर्णयाला कांचन देशमुख, अनिरुद्ध आणि अभिषेक यांनी विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात चांगले बदल होणार आहेत.
-
अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे.
-
अनिरुद्धपासून वेगळं झाल्यानंतर अरुंधतीने नव्या उमेदीने आयुष्याला सुरुवात केली. आपला आवाज आणि मेहनत याच्या जोरावर तिने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली. यामध्ये तिला आशुतोष केळकरचीही खूप मदत झाली.
-
याच प्रवासात अरुंधती आशुतोषच्या प्रेमात पडली आणि तिने आशुतोषबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच अरूंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होणार आहे.
-
अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये आपण अरुंधती आणि आशुतोषला वर आणि वधूच्या वेशात पाहू शकतो.
-
या लग्नासाठी अरुंधतीने भगव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर गडद निळ्या रंगाची शाल घेतली आहे. तर आशुतोषने क्रीम कलरची शेरवणी आणि त्यावर काळ्या रंगाचा व्हेलवेटची शाल घेतली आहे.
-
देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी अरूंधतीच्या लग्नाला तीव्र विरोध करणाऱ्या कांचन देशमुख तिला मिठी मारून रडताना दिसतील.
-
घरच्या घरीच मात्र अतिशय थाटामाटात पार पडणार आहे. यावेळी सगळे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडतील.
-
यानंतर अरुंधतीचं देशमुखांबरोबरचं नातं कसं असेल, आशुतोष आणि अरूंधतीच्या नात्यावर याचा परिणाम काय होणार, केळकर आणि देशमुख या दोन कुटुंबामधील समतोल अरुंधती कसा राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
सर्व फोटो : स्टार प्रवाह
