-
आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही, शिक्षणासाठी आई-वडिलांकडे पैसे नसतानाही वयाच्या २२ व्या वर्षी सफीन हसन यांनी युपीएसएसी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस अधिकारी झाले. ज्या वयात तरुण मौज मजा करत असतात त्यावेळी सफीन हसन देशसेवेसाठी सज्ज झाले होते. परीक्षेला जात असतानाच अपघात होऊन हात मोडलेला असतानाही, डोक्यातून भळाभळा रक्त वाहत असतानाही सफीन यांनी परीक्षा दिली होती. आज त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो – फेसबुक)
-
सफीन हसन मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती.
-
सफीन हसन यांचे वडील इलेक्ट्रिशिअन होते, तर आई घर चालवत होती. अनेकदा सफीन यांच्या कुटुंबाकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे.
-
सफीन गुजरातमधील सूरत जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील सुरुवातीला एका हिऱ्याच्या काऱखान्यात काम करत होते. पण त्यांची नोकरी गेली आणि आर्थिक संकट उभं राहिलं. यानंतर सफीन यांच्या वडिलांनी इलेक्ट्रिशिअनचं काम हाती घेतलं. तसंच थंडीमध्ये अंडी आणि चहाचा स्टॉलही लावला.
-
सफीन यांची आई गृहिणी होती. घरासाठी त्यांनी लग्न समारंभारत चपात्या बनवायचं कामही त्यांनी केलं आहे.
-
सफीन यांनी शाळेत असतानाच नागरी सेवेत जाण्याचा निर्धार केला होता.
-
सफीन पाचवीत असताना शाळेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. त्यांचा रुबाब पाहून सफीन यांनी शिक्षकांना हे कोण आहेत असं विचारलं होतं. त्यावर शिक्षकांनी त्यांना समजावं म्हणून हे जिल्ह्याचे राजे आहेत असं सांगितलं होतं. पण सफीन यांच्या मनात ती गोष्ट घर करुन राहिली आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचं ठरवलं.
-
गुजरातमधील कानोदर या छोट्या गावात सफीन हसन यांचं कुटुंब वास्तव्यास होतं. सफीन सुरुवातीपासून शिक्षणात अव्वल होते. अकरावीला त्यांना सायन्स घ्यायचं होतं पण गावातील सरकारी कॉलेजमध्ये ती सुविधा नव्हती. दुसरं कॉलेज त्यांना परवडणारं नव्हतं.
-
त्याचवेळी गावात एक नवीन शाळा सुरु झाली जिथे सफीन यांचे जुने शिक्षक होते. त्यांनी सफीनला शिक्षणासाठी मदत केली.
-
युपीएएसची परीक्षा द्यायला जात असताना सफीन यांचा मोठा अपघात झाला होता.
-
त्यादिवशी सफीन परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडले. सकाळी ९ वाजता त्यांचा जीएस ३ चा पेपर होता. परीक्षेला जात असतानाच सकाळी ८.३० वाजता सफीन यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
-
अपघातात सफीन यांना जबरदस्त मार लागला होता. त्यांचा हात मोडला होता, डोक्यातून रक्तही वाहत होतं.
-
त्यांनी उठून पाहिलं तर त्यांचा उजवा हात सुरक्षित होता. त्याचवेळी त्यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
-
सफीन म्हणतात त्यावेळी आपल्याकडे दोनच पर्याय होते. एकतर मी उठून हे माझ्यासोबत का झालं असं म्हणत रडत बसणे आणि रुग्णालयात जाऊन दाखल होणे. आणि दुसरा म्हणजे मी अजून तीन तास सहन करु शकतो का ? सफीन यांनी दुसरा पर्याय निवडला. सफीन परीक्षा देण्यासाठी हॉलमध्ये पोहोचले.
-
२० मार्च रोजी संसर्ग झाल्याने सफीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खूप ताप असल्याने सफीन यांना सलाईन लावण्यात आली होती. दुसरीकडे २३ मार्चला सफीन यांची मुलाखत होणार होती.
-
१ मार्चला उपचारानंतर सफीन यांनी दिल्लीला जाऊन मुलाखतीसाठी तयारी करायचं ठरवलं. २ मार्चला ते दिल्लीला पोहोचले. ३ मार्चला सफीन यांना टॉन्सिलाइटिस अटॅक आल्याने विमान पकडून ते पुन्हा अहमबदाबादला आले.
-
त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. १५ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
-
१६ मार्चला सफीन दिल्लीत पोहोचले आणि २३ मार्चला त्यांनी युपीएससीची मुलाखत दिली.
-
तब्बल एक महिना सफीन रुग्णालयात दाखल होते. यामुळे त्यांना मुलाखतीसाठी तयारी करण्यास अजिबात वेळ मिळाला नव्हता. दुसरीकडे मुलखतीला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर उमेदवारांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी केल्याचा एक मानसिक दबाव त्यांच्यावर होता.
-
यावेळी सफीन यांनी पुन्हा एकदा हीच स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ आहे असा विचार केला. सफीन यांनी मुलाखत दिली. इतकंच नाही तर मुलाखतीत त्यांनी देशातून दुसरा क्रमांक मिळवला.
-
८.३० वाजता अपघात झाल्यानंतरही ९ वाजता जर तुम्ही परीक्षा देण्यासाठी जात असाल. मुलाखतीच्या एक महिना आधी तुम्ही रुग्णालयात दाखल आहात आणि एक आठवडा आधी दिल्लीत जाऊन त्याची तयारी करु शकत असाल तर नशिबाला तुमच्याकडे यावच लागेल असं सफीन सांगतात.
-
जेव्हा लोक सफीन यांना तुमच्या आयुष्यातील कोणती गोष्ट बदलावी असं वाटतं ? असं विचारतात तेव्हा सफीन कोणतीच नाही असं सांगतात. कारण आयुष्यात त्या गोष्टी नसत्या तर आज जे आहे त्याची किंमत नसती आणि मी आहे तिथं नसतो असं ते सांगतात.
-
IAS, IPS होण्यासाठी जर तुम्हाला त्याग करावा लागला नाही तर भारतातील प्रत्येक घरात IAS, IPS दिसतील.
-
आयुष्यात यशस्वी झालेल्या प्रत्येकाचा आयुष्यातील प्रवास आपण पाहिला तर त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आलेली असते जेव्हा संघर्ष सर्वोच्च टप्प्यावर असतो. त्याचवेळी आपण तिथून पुढे जायचं आहे की यु-टर्न घ्यायचा हा निर्णय घेतो. जे पुढे जातात तेच यशस्वी होतात आणि हाच यशाचा मंत्रा आहे असं सफीन सांगतात.
-
आयुष्यात एक वेळ अशी येते ज्या क्षणी तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. फक्त ती वेळ कोणती आहे हे ओळखणं गरजेचं असतं असं सफीन म्हणतात.
-
आयुष्यात ध्येय ठरलं असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही काहीही करु शकता. देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी ठरलेल्या सफीन हसन यांचा प्रवास पाहिला की हे प्रकर्षान जाणवतं.

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप