पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी लोकलेखा समितीच्या (पीएसी) अध्यक्षपदी केलेली नियुक्ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लोकलेखा समितीच्या अध्यक्ष पदावरून तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजप यांच्यात दुसऱ्यांदा वाद निर्माण झाला आहे. कृष्णनगर उत्तरचे आमदार मुकुल रॉय यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत लोकलेखा समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मुकुल रॉय यांच्या राजीनाम्याच्या एका आठवड्यानंतर सभापतींनी सोमवारी भाजप आमदार कृष्णा कल्याणी यांची नियुक्ती केली होती. कृष्णा कल्याणी यांनी रॉय यांच्याप्रमाणेच गेल्या वर्षी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. कल्याणी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये होते पण गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंजमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा टीएमसीमध्ये परतले. अधिकृतपणे आमदारकीचा राजीनामा न देता तृणमूलमध्ये गेलेल्या भाजपच्या पाच आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकुल रॉय हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.त्यानंतर रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये आल्यानंतर रॉय यांना गेल्या वर्षी पीएसी प्रमुख बनवण्यात आले होते. त्यांनी पक्ष बदलला तरी आमदारकीचा राजीनामा दिला नाही याला भाजपाने आक्षेप घेतला. विधानसभेचा राजीनामा दिला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही निवड चुकीची असल्याची भूमिका भाजपाने घेतली होती. रॉय यांच्या नेमणुकीप्रमाणेच कल्याणी यांची नियुक्ती सुध्दा चुकीची असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. विधानसभेच्या परंपरेनुसार विरोधी पक्षाच्या आमदाराला हे पद दिले जात असल्याने भाजपने सभापतींच्या निर्णयाला विरोध केला आहे. पीएसीच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो.

“माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आहे. पीएसीच्या अध्यक्षांची नियुक्ती हा विधानसभा अध्यक्षांचा विशेषाधिकार आहे. त्यांनी माझी या पदावर माझी नियुक्ती केली आहे. आता मी सर्वांकडून सहकार्य मिळावे अशी विनंती” अशी विनंती कल्याणी यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पीएसी प्रमुखाची नियुक्ती करताना सभागृहाचे नियम पाळले नाहीत असा आरोप भाजपाने केला आहे. अध्यक्षांच्या या निर्णयाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार भाजपा करत आहे.

विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा म्हणाले, “आम्ही यापूर्वी भाजप आमदार आणि अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांच्या नावाचा पीएसीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांच्या नावाची निवड अध्यक्षांनी केली नाही. कल्याणी आता कोणत्या पक्षात आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. केवळ विधानसभेला त्याची कल्पना नाही. सभापती कार्यालय तेच सांगत आहे, कागदावर ते भाजपचे आमदार आहेत. या नियुक्तीला आमचा तीव्र विरोध आहे. या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देण्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी चर्चा करत आहोत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल”.