छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर मतदारसंघ बांधणीच्या कामास लागलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना राजकीय बळ देण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी आठ वाजता अजितदादा आढावा बैठकही घेणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम बैठकीनंतर उपमुख्यमंत्री स्तरावरील व्यक्तीने जिल्ह्याचा कामाचा आढावा घेतला नव्हता. त्यामुळे एका बाजूला प्रशासकीय पळापळ आणि दुसरीकडे गंगापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब हे गंगापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात अधिक लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

पदवीधर मतदारसंघातून आमदार सतीश चव्हाण हे तीन वेळा निवडून आले आहेत. २००८ पासून पदवीधर मतदारसंघात प्रयोग करूनही भाजपला यश आले नव्हते. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीऐवजी विधानसभा मतदारसंघ बांधणीला आमदार चव्हाण यांनी प्राधान्य दिले असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. काही महिन्यांपूर्वी गंगापूर येथे मराठवाडा साहित्य संमेलनही घेतले. या कार्यक्रमासही अजित पवार येणार होते. मात्र, तेव्हाही त्यांच्या आगमनासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा गंगापूर दौरा ठरविण्यात आला आहे. २००९ पासून गंगापूर मतदारसंघावर प्रशांत बंब यांचे वर्चस्व आहे. प्रत्येक गावातील व्यक्तींची माहिती बंब यांच्या समर्थकांकडे असते. गेल्या दोन निवडणुकींपासून मतदारसंघ बांधण्यासाठी समाजशास्त्रात पदवी घेतलेल्या तरुणांची फळीही तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशांत बंब हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Yavatmal Washim lok sabha election 2024 constituency overview Shinde group benefit or loss of changing candidates at last minute
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?
health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
Thane Lok Sabha
कोणताही उमेदवार द्या पण, तो शिवसेनेचाच असावा; नवी मुंबईतील शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला सूर

हेही वाचा – विविध समूह घटकांचा विश्वास संपादन करण्यावर अजित पवार गटाचा भर

हेही वाचा – रायगडमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून मतांची बेगमी

राजकीय पातळीवर सुरू असणारे मैत्र एका बाजूला असताना मतदारसंघ बांधणीच्या कामाला लागलेल्या सतीश चव्हाण यांना बळ देण्यासाठी अजित पवार यांचा गंगापूरचा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघाचा लोकसभेतील कौलही महत्त्वपूर्ण मानला जातो. शिवसेनेच्या उमेदवारास या मतदारसंघातून कमी मते मिळत असल्याची आकडेवारी आता राजकीय पक्षांकडे उपलब्ध आहे. तीन लाख ९ हजार मतदार असणाऱ्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना ६० हजार ८२ आणि हर्षवर्धन जाधव यांना ६४ हजार ३९३ मते मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा प्रचार प्रभावी ठरला होता. तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांना ९१ हजार ९७१ मते मिळाली होती. आता लोकसभा मतदारसंघाच्या बांधणीची जबाबदारी आमदार प्रशांत बंब यांना दिलेली आहे. या राजकीय परिस्थितीमध्ये आमदार चव्हाण यांच्या गंगापूरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. अशा काळात अजित पवार यांचा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.