पुणे : पुण्याचा विस्तार वाढत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात हिंजवडी आणि चाकण या दोन स्वतंत्र महापालिका करण्याबरोबरच उरळीदेवाची, फुरसुंगी, लोणीकाळभोर आणि वाघोली या परिसराची आणखी एक महापालिका तयार करण्याची गरज असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना पुरंदरचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहामुळे उरळीदेवाची देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली.
अजित पवार आणि शिवतारे यांच्यात राजकीय वैर कायम असून, जिल्ह्याचा सर्वेसर्वा असतानाही विश्वासात न घेता विधानसभा निवडणुकांपूर्वी नगरपरिषदेचा निर्णय झाल्याची अजित पवार यांच्या मनातील बोच कायम होती. अखेर त्यांनी उरळीदेवाची आणि फुरसुंगी या गावांसह स्वतंत्र महापालिका करण्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कुरघोडी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघात अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी ‘बघतोच कसा निवडून येतो’ या शब्दात जाहीरपणे आव्हान दिले होते. त्यामुळे शिवतारे यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत महायुती असतानाही शिवतारे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी झेंडे यांना उमेदवारी देत मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली शिवतारे यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. मात्र, शिवतारे हे विजयी झाले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शिवतारे यांच्या आग्रहास्तव शिंदे यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी ही पुणे महापालिकेतील गावे वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीच्या तुलनेत मालमत्ताकर दुप्पट घेतला जात असल्याचे कारण या गावातील ग्रामस्थांनी पुढे केले. शिवतारे यांच्या पुढाकारामुळे शिंदे यांनी या दोन गावांची नगरपरिषद करण्याचा निर्णय जाहीर करून शिवतारे यांचा हट्ट पुरविला.
या गावांमध्ये पुण्याचा कचरा डेपो आहे. ही गावे महापालिकेत आल्यानंतर महापालिकेने विकासकामांवर सुमारे २२५ कोटी रुपये खर्च केले आणि अजूनही खर्च सुरू आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हेतूने प्रेरित नगरपरिषद करण्याचा निर्णय मार्च २०२३ मध्ये घेण्यात आला. त्याचा अध्यादेशही काढण्यात आला. मात्र, नगरपरिषदेचा कारभार प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत पुणे महापालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन गावांसह लोणीकाळभोर आणि वाघोली या आणखी दोन गावांची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याची जाहीरपणे भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुरघोडीला बळ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आणि चाकण यासह उरळीदेवाची, फुरसुंगी, लोणीकाळभोर आणि वाघोली या गावांची मिळून आणखी एक अशा तीन महापालिकांची गरज असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यात सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका असून, आणखी एका महापालिकेची गरज आहे का, हे पाहावे लागेल, असे वक्तव्य केले. मात्र, ती एक महापालिका कोणती असेल, हे स्पष्ट केले नाही किंवा उरळीदेवाची आणि फुरसुंगी या नवीन नगरपरिषदेबाबतही वाच्यता केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने अजित पवारांच्या कुरघोडीला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. नगरविकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने ते कोणती भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.