आंध्र प्रदेशमध्ये आरोप प्रत्यारोपांना पूर आला आहे. टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यासाठी काय केले? असा प्रश्न मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी एका सभेमध्ये विचारला होता. त्याला उत्तर म्हणून टीडीपीने ‘सेल्फी मोहीम’ हाती घेतली आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी इमारतींसमोर फोटो घेत ‘आमच्या काळात अशा प्रकारचे काम झाले,’ असे नायडू म्हणाले आहेत. चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र एन लोकेश नायडू यांनीदेखील विकासकामांसोबतचा सेल्फी समाजमाध्यमांवर अपलोड करत जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

YSRCP सरकारने सुरू केलेल्या काही कल्याणकारी योजना भविष्यातही सुरू ठेवण्यासाचा जगनमोहन रेड्डी यांनी निर्णय घेतला आहे. या योजनांबाबत निर्णय घेताना त्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी टीडीपी तसेच चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP पक्षाची मतं फुटली. क्रॉस वोटिंग केल्यामुळे त्यांनी चार आमदारांना पक्षातून निलंबित केले. मात्र या घटनेमुळे डीडीपीचे दोन आमदार निवडून आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपीवर सडकून टीका केली. नायडू यांनी आंध्र प्रदेशसाठी काय केले? असा सवाल त्यांनी केला. त्यांच्याच प्रश्नाला उत्तर म्हणून टीडीपीने ‘सेल्फी मोहीम’ सुरू केली.

हेही वाचा >> राज्यपालांच्या कारभाराविरोधात स्टॅलिन आणखी आक्रमक; बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचे केले आवाहन

भविष्यातही विकासकामांचे सेल्फी फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करू

गुरुवारच्या सकाळी चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियावर एक सेल्फी अपलोड केला होता. या फोटोमध्ये ते नव्याने बांधलेल्या इमारतीसमोर उभे होते. आमच्या काळात गरिबांना घर देण्याचे काम झाले, असे नायडू यांना या सेल्फीतून सुचवायचे होते. त्यानंतर नायडू यांचे पुत्र लोकेश नायडू यांनीदेखील एक सेल्फी फोटो समाजमाध्यमांवर अपलोड केला. किया मोटर्स कंपनीसमोर त्यांनी हा फोटो काढला होता. तसेच या दोघांनीही टीडीपी सरकारच्या काळात जी कामे झाली किंवी जी कामे सुरू आहेत, त्यांचे सेल्फी फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करू, असे आश्वासन दिले आहे. मंगळवारी नायडू यांनी एक सेल्फी व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग महिला दिसत होती. या महिलेला प्रतिमहिना १५०० रुपये भत्ता मिळतो. ही योजना टीडीपी सरकारच्या काळातलीच आहे, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले आहेत. तसेच जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या सरकारमध्ये कोणती विकासकामे केली आहेत? ते सांगावे असे आव्हानही नायडू यांनी दिले.

हेही वाचा >> मोर्चे आणि यात्रांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये भाजपचा ताकद वाढविण्याचा प्रयत्न

ती इमारत आमच्या सरकारने बांधलेली

सत्तेत येण्यासाठी चंद्राबाबू नायडू येथील जनतेला भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे नायडू याआधीच म्हणालेले आहेत. चंद्रबाबू नायडू यांच्या या सेल्फी मोहिमेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीका केली आहे. “चंद्रबाबू नायडू यांचे सेल्फी चॅलेंज हा पब्लिसिटी स्टंट आहे. नायडू यांना सेल्फी काढण्याचा तसेच राजकीय आव्हान करण्याचा आणि लोकांच्या घरासमोर स्वत:च्या पक्षाचे स्टिकर्स लावण्याचा नैतिक अधिकार नाही. नायडू यांनी अपलोड केलेल्या फोटोतील इमारत ही आमच्या सरकारने बांधलेली आहे. लोकांची पिळवणूक, फसवणूक करण्यासाठी ते समाजमाध्यमांवर सेल्फी अपलोड करत आहेत का?” अशी टीका जगनमोहन रेड्डी यांनी केली.

आम्ही आमच्या जाहीरनाम्याला भगवद्गीता, बायबल आणि कुराण मानतो

“आमच्या सरकारने मागील ४५ महिन्यांमध्ये लाभार्त्यांच्या थेट खात्यात २ लाख ७ हजार कोटी रुपये टाकलेले आहेत. चंद्राबाबू नायडू त्यांच्या काळात लोकांना हा निधी का देऊ शकले नाहीत, असे जनतेने त्यांना विचारावे. टीडीपीने त्यांचा ६०० पानी जाहीरनामा कचऱ्यात टाकला आहे. मात्र आम्ही आमच्या जाहीरनाम्याला भगवद्गीता, बायबल आणि कुराण मानतो. आम्ही जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत,” असे जगनमोहन रेड्डी म्हणाले.

हेही वाचा >> मुस्लीम मतदारांसाठी केरळमध्ये भाजपाचा आगळावेगळा प्लॅन, घरी जाऊन देणार ईदनिमित्त शुभेच्छा!

मी फक्त जनता आणि देवावर अवलंबून- जगनमोहन रेड्डी

रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याकडून जो दावा केला जात आहे, त्याला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. ही जनताच माझे बळ आहे. मी फक्त जनता आणि देवावर अवलंबून आहे. तुम्हाला आतापर्यंत ज्या सुविधा मिळालेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्यावा, असे माझे आवाहन आहे, असेही जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या जनतेला उद्देशून म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh jagan mohan reddy chandrababu naidu clash selfie war on development prd
First published on: 13-04-2023 at 21:58 IST