उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी (एसपी)समोर भाजपाच्या राम मंदिर व हिंदुत्व या मुद्द्यांचे मोठे आव्हान आहे. मात्र, आता त्यांच्या आव्हानात आणखी भर पडली आहे. कारण- बसपाने ८० पैकी ४६ जागांवर आपले मजबूत उमेदवार उभे केले आहेत. या यादीत मुस्लीम आणि ब्राह्मण उमेदवारांचा समावेश असल्याने इंडिया आघाडीच्या पारंपरिक मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे.

अल्पसंख्याक-बहुल जागांवर मुस्लीम उमेदवार

बसपने आतापर्यंत घोषित केलेल्या नावांपैकी ११ उमेदवार मुस्लीम आहेत. मध्य उत्तर प्रदेशमधील कन्नौज, लखनौसह सहारणपूर, मुरादाबाद, रामपूर, संभल, अमरोहा, पिलिभीत यांसारख्या पश्चिम उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक-बहुल जागांवर बसपने मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. सपाने ५० जागांसाठी जाहीर केलेल्या यादीत असणार्‍या मुस्लीम नावांपैकी बसपने जाहीर केलेल्या मुस्लिम उमेदवारांची संख्या जास्त आहे. मुस्लिम उमेदवारांव्यतिरिक्त बसपने अकबरपूरमधून राकेश द्विवेदी, मिर्झापूरमधून मनीष त्रिपाठी, उन्नावमधून अशोक कुमार पांडे, फैजाबादमधून सचिदानंद पांडे, बस्तीमधून दयाशंकर मिश्रा यांसारखे ब्राह्मण उमेदवार उभे केले आहेत. तर, यादीतील इतर उमेवार दलित आहेत.

हेही वाचा : मतदानात महिला पुढे; मग उमेदवारीत मागे का? महिलांना उमेदवारी देण्यात केरळमधील राजकीय पक्षांच्या उदासीनतेचे कारण काय?

नवीन बाबरी मशिदीचे आश्वासन

बसपचे राष्ट्रीय समन्वयक व मायावतींचे वारसदार आकाश आनंद यांनी अलीकडेच जोरदार लोकसभा प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी आपल्या प्रचारसभेत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येतील राम मंदिर तयार करण्यासाठी पाडण्यात आलेल्या मशिदीच्या जागी नवीन मशीद उभारण्यात येईल. जेव्हाही ही मशीद बांधली जाईल तेव्हा बसप पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मायावतींनी मुरादाबाद, पिलिभीत, नगीना व बिजनौरसह पश्चिम उत्तर प्रदेशच्या इतर जागांवर प्रचारसभा घेण्याची योजना आखली आहे. पक्षाने उमेदवारी दिलेल्या ११ मुस्लिमांमध्ये गोरखपूरमधील जावेद सिमनानी यांचा समावेश आहे. बसपने अलीकडच्या काळात येथून एकही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. भाजपाच्या पारंपरिक मतपेढी असलेल्या या जागेवरून पूर्वी बसपने ब्राह्मण किंवा निषाद उमेदवार उभे केले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी आपला तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या सपासाठी मतदारसंघ सोडला होता.

गोरखपूरमध्ये मुस्लीम आणि निषादांची संख्या लक्षणीय

गोरखपूरमध्ये मुस्लीम आणि ओबीसी निषादांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ब्राह्मण असलेल्या रवि किशन यांना उमेदवारी दिली आहे. कारण- निषाद पक्ष त्यांच्या मित्रपक्षांपैकी एक असल्याने भाजपाला निषाद समुदायाचा पाठिंबा आवश्यक आहे. सिमनानी हे मुस्लीम असल्यासह एका सुप्रसिद्ध कुटुंबातील स्थानिकदेखील आहेत. एटामधून बसपने काँग्रेसचे माजी नेते मोहम्मद इरफान यांना उमेदवारी दिली आहे. या जागेचे प्रतिनिधित्व भाजपाचे ओबीसी लोध नेते व माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी केले होते आणि आता त्यांनी त्यांचा मुलगा राजवीर सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. समाजातील मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने सपाने या जागेवरून एका शाक्य नेत्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मुस्लीम मते आपल्या बाजूने एकत्रित करण्याचा सपा प्रयत्न करीत आहे.

पंतप्रधान मोदींविरोधातही बसपचा मुस्लीम उमेदवार

बसपने वाराणसीमधून अतहर जमाल लारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभे केले आहे. लारी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून अपना दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि जवळपास ९३ हजार मते मिळवली होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बसपने वाराणसीतून मोदींच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. २००९ मध्ये बसपने मुख्तार अन्सारी यांना भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात उभे केले होते. मुख्तार या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांना लाखाच्या संख्येत मते मिळाली होती. त्यामुळे लारी यांना भरघोस मुस्लीम मते मिळू शकतात. काँग्रेसने आपले स्थानिक नेते अजय राय यांना येथून उमेदवारी दिली आहे.

सहारणपूरमध्ये बसपने विद्यमान खासदार हाजी फजरुल रहमान यांना डावलून माजिद अली यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने या जागेवर इम्रान मसूदला उमेदवारी दिली आहे. “इम्रान मसूद या जागेवर जिंकणार नाही, हे माहीत असूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी का दिली,” असा सवाल मायावतींनी केला. दुसरीकडे त्या म्हणाल्या, “बसपला केवळ मुस्लिमच नाही, तर दलितांचाही आधार आहे.”

२०१३ च्या दंगलींवरून सपावर टीका

मुझफ्फरनगरमध्ये मायावती २०१३ च्या दंगलींबद्दल बोलल्या आणि सपाच्या शासनकाळात या दंगली घडल्याचा आरोप केला. मुझफ्फरनगरमध्ये बसपने मागासवर्गीय उमेदवार उभा केला आहे. त्यांनी दारा सिंह प्रजापती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जाट असलेल्या संजीव बालयान यांना या जागेवरून भाजपाने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांना राजपूतांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सपाने येथे जाट असलेल्या हरेंद्र मल्लिक यांना उभे केले आहे.

बसपने सपाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या कन्नौज येथून इम्रान बिन जाफर यांना विद्यमान खासदार व भाजपाचे उमेदवार सुब्रत पाठक यांच्या विरोधात उभे केले आहे. लखनौमध्ये केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार राजनाथ सिंह यांच्याविरोधात सपाने सरवर मल्लिक यांना उमेदवारी दिली आहे. घोसीमध्ये बसपने विद्यमान खासदार अतुल राय यांना डावलून त्यांच्याऐवजी बाळकृष्ण चौहान यांना तिकीट दिले आहे. ते अतुल राय यांच्याकडून २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झाले होते. चौहान यांनी यापूर्वी बसप आणि सपा या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व केले आहे.

या जागेवरील एनडीएचे उमेदवार अरविंद राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख ओम प्रकाश राजभर यांचे पुत्र आहेत; तर इंडिया आघाडीने राजीव राय यांना उमेदवारी दिली आहे. राय हे पूर्व उत्तर प्रदेशातील भूमिहार नेते आहेत, तर राजभर हे ओबीसी नेते आहेत. बसपच्या इतर उमेदवारांमध्ये आझमगढमधून माजी प्रदेशाध्यक्ष भीम राजभर, चंदौलीमधून सत्येंद्र कुमार मौर्य व रॉबर्ट्सगंजमधून वकील धनेश्वर गौतम यांच्या नावाचा समावेश आहे. या तिन्ही जागांवर सध्या सपाचे प्रतिनिधित्व आहे.

बसपने आपले ब्रीदवाक्य बदलले

बसपने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य बदलून, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ केले असल्याचे लक्षात आले आहे. बसपच्या पोस्टर्सवरही हे ब्रीदवाक्य दिसले. बसपच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. “बहुजन म्हणजे सर्वजन किंवा सर्व समाज. बसप हा देशातील एकमेव असा पक्ष आहे; जो सर्व समाजांचे प्रतिनिधित्व करतो. बसप पक्ष स्थापन होण्यापूर्वी समाजात असे काही वर्ग होते; ज्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही.”

हेही वाचा : काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?

उत्तर प्रदेशमध्ये काही वर्षांपासून बसपची घसरण सुरू आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फक्त एक जागा जिंकली होती आणि त्यांच्या मतांमध्येही घट पाहायला मिळाली होती. २०१९ मध्ये बसपने सपाबरोबर युती करून निवडणूक लढवली होती आणि त्यात १९ टक्के मतांसह १० जागा जिंकल्या होत्या. परंतु, आता पक्षातील बहुतेक विद्यमान खासदारांनी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला आहे.