देशाच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेसचे एकूण ४० आमदार रांचीला परतले आहेत. सोमवारी (५ फेब्रुवारी) जेएमएम आणि काँग्रेस सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तर, दुसरीकडे शेजारच्या बिहार राज्यातील १९ पैकी १६ आमदार दिल्लीहून हैदराबादला गेले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी बिहारमधील एनडीए सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदारफुटीची शुक्यता लक्षात घेऊन, काँग्रेसने हा निर्णय घेतला.
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा आरोप
भाजपाकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपा यांच्याकडे एकूण १२८ आमदार आहेत. म्हणजेच जेडीयू आणि भाजपाकडे बहुमत सिद्ध करण्यापुरते आमदार आहेत. तरीदेखील बिहारमधील महायुतीत फूट पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जातोय. याच कारणामुळे काँग्रेसने आपले आमदार थेट हैदरबादला पाठविले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेनंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता
“भाजपाकडून आमच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच आमच्या आमदारांना अगोदर दिल्लीमध्ये बोलावले होते,” असे काँग्रेसच्या बिहारमधील एका आमदाराने सांगितले. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा २९ व ३० जानेवारी रोजी बिहारमध्ये आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या पक्षात फूट पडेल, अशी भीती व्यक्त केली जात होती, असे आणखी एका नेत्याने सांगितले.
आमदार हैदराबादला गेल्याची पुष्टी
बिहार काँग्रेसचे प्रवक्ते असितनाथ तिवार यांनी आमदारांना हैदराबादमध्ये पाठविण्यात आल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. “आमचे आमदार दिल्लीमध्ये गेले होते. या आमदारांनी आमच्या हैदराबादमधील काँग्रेसच्या युनिटला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांनंतर ते पाटण्यात परततील,” असे तिवारी यांनी सांगितले.
भाजपाची काँग्रेसवर टीका
भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी मात्र काँग्रेसच्या या दाव्यावर टीका केली. “काँग्रेस आपल्या आमदारांना मजुरांप्रमाणे वागणूक देत आहे. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या आरोपांत कोणतंही तथ्य नाही. काँग्रेसने त्यांच्या आमदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे,” असे विजयकुमार सिन्हा म्हणाले.
गेल्या आठवड्यातही काँग्रेसमध्ये अस्वस्थता
याआधीही बिहार काँग्रेसमध्ये अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात बिहार काँग्रेसचे काही आमदार संपर्कात नसल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. अशा वेळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पाटण्यात धाव घेत, तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता.
जीतन राम मांझी यांच्याकडून आणखी एका मंत्रिपदाची मागणी
दरम्यान, एकीकडे नितीश कुमार यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचे आवाहन आहे. असे असतानाच माजी मुख्यमंत्री तथा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख जितन राम मांझी यांनी, आम्हाला आणखी एक मंत्रिपद हवे आहे, अशी मागणी नितीश कुमार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे नितीश कुमार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.