scorecardresearch

Premium

राहुल गांधी-प्रियांका गांधी यांच्यात आलबेल नसल्याचा दावा, नव्या रणनीतीचा भाजपाला फायदा होणार?

राहुल गांधी आणि प्रियांका गाधी या भाऊ-बहिणीमध्ये पक्षातील महत्त्व आणि राजकारणात मिळणाऱ्या संधीवरून वाद होत आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.

PRIYANKA GANDHI AND RAHUL GANDHI (1)
राहुल गांधी, प्रियांका गांधी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. म्हणूनच भाजपाने काँग्रेसविरोधातील प्रचाराला बळ दिले आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी केलेल्या ‘इंडिया’ या आघाडीवर भाजपा सडकून टीका करत आहे. असे असतानाच भाजपाकडून आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या भाऊ-बहिणीला लक्ष्य केले जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. काँग्रेस तसेच विरोधकांना शह देण्यासाठी भाजपाची ही रणनीती असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपाकडून काय दावा केला जात आहे?

गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून समाजमाध्यमामार्फत एक खास प्रचार केला जात आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गाधी या भाऊ-बहिणीमध्ये पक्षातील महत्त्व आणि राजकारणात मिळणाऱ्या संधीवरून वाद होत आहेत, असे भाजपाकडून दाखवले जात आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील राहुल गांधी यांनाच पुढे करत आहेत. त्यांचा पाठिंबा हा राहुल गांधी यांनाच आहे. त्याामुळे प्रियांका गांधी सध्या नाराज आहेत, असा दवा भाजपा करत आहे. त्यासाठी भाजपाने एक व्हिडीओ आपल्या समाजमाध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका गांधी राहुल गांधी यांचा हात पकडण्यास नकार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर भाजपाच्या अन्य एका नेत्याने राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्याकडून राखी बांधून घेतलेली नाही, असा दावा केला होता.

satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?
Punjab Politics
पंजाबमध्ये ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढल्यास ‘इंडिया आघाडी’ला फायदा? काय सांगते २०२२ च्या निवडणुकीची आकडेवारी? वाचा…
Advani to Swaminathan BJP 4 points behind giving Bharat Ratna
अडवाणी ते स्वामिनाथन! ५ दिग्गजांना सर्वोच्च सन्मान; ‘भारतरत्न’ देण्यामागे भाजपाचे ४ मुद्दे; नेमकं राजकारण काय? वाचा…

सर्व दावे निरर्थक, काँग्रेसचे स्पष्टीकरण

गेल्या अनेक वर्षांपासून राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यातील संबंध हा राजकीय दृष्टीने चर्चेचा विषय राहिलेल आहे. राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वी प्रियांका गांधी यांच्याकडे लोक इंदिरा गांधी यांची नात म्हणून पाहायचे. त्या काळात प्रियांका गांधी याना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. सध्या प्रियांका गांधी यांच्यासह राहुल गांधी हेदेखील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे राहुल गांधींमुळे प्रियांका गांधी यांना संधी मिळत नाही, अशी मांडणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे. याचाच भाजपा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान भाजपाकडून केले जाणारे हे सर्व दावे निरर्थक आहेत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलेले आहे.

‘पप्पू’, ‘शेहजादा’ असे म्हणत निर्भत्सना केली जायची

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारलेली आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’पासून त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. याआधी भाजपाकडून राहुल गांधी यांची ‘पप्पू’, ‘शेहजादा’ असे म्हणत निर्भत्सना केली जायची. आता मात्र राहुल गांधी यांच्या राजकीय छबीत सुधारणा झाली असून पप्पू किंवा शेहाजादा अशी टिंगल करणे फायद्याचे ठरणार नाही, असे भाजपाला वाटत आहे. याच कारणामुळे प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात वाद असल्याचे दाखवले जात आहे. भविष्यात राहुल गांधी यांचे राजकीय महत्त्व कमी व्हावे, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

काँग्रेसला अल्पसंख्याक समाजाची मते मिळण्याची भाजपाला भीती?

भाजपातील सूत्रांनुसार राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते मिळण्याची भीती भाजपाला वाटत आहे. काही प्रादेशिक पक्षदेखील इंडिया या आघाडीला साथ देण्याची शक्यता आहे, असे भाजपाला लाटते. अल्पसंख्याकांनी काँग्रेससारख्या पक्षाला पाठिंबा दिल्यास भाजपासाठी आव्हानात्मक ठरेल, असे भाजपाला वाटते.

भाजपाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?

भाजपाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये भाजपाने राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला होता. “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा याच्यातील संबंध हे सामान्य भाऊ-बहिणीसारखे नाहीत. प्रियांका गांधी-वाड्रा या राहुल गांधी यांच्यापेक्षा सरस आहेत. काँग्रेसकडून मात्र नेहमीच राहुल गांधी यांना पुढे केले जाते. सोनिया गांधी यादेखील नेहमीच राहुल गांधी यांच्या पाठीशी असतात. याच कारणामुळे प्रियांका गांधी-वाड्रा या घमंडी युतीच्या (इंडिया आघाडी) बैठकीपासून दूर होत्या. प्रियांका गांधी-वाड्रा यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला जात आहे,” असे या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.

“प्रियांका गांधी राहुल गांधी यांच्यावर मात करणार का?”

त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी राहुल गांधींनी प्रियांका गांधी यांच्याकडून राखी बांधून न घेतल्याचा दावा केला होता. अमित मालवीय यांचा हा दावा पुढे काँग्रेसने खोडून काढला होता. त्यासाठी राहुल गांधींचा एका सभेतील राखी बांधलेला फोटो काँग्रेसने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांच्या समाजमाध्यमाच्या खात्यावर एक पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मध्ये सोनिया गांधी यांना दाखवण्यात आले होते. तसेच प्रियांका गांधी राहुल गांधी यांच्यावर मात करू शकणार का? असे विचारून या दोन्ही नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला होता.

आमचे लक्ष विचलित होईल, असे भाजपाला वाटते- श्रीनेत

काँग्रेसने भाजपाचा हा दावा फेटाळून लावला होता. भाजपाच्या या प्रचारावर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया दिली होती. “अदानी महाघोटाळा, बेरोजगारी, मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी भाजपाकडून अशा प्रकारे चुकीचा प्रचार केला जात आहे. अशा प्रचारामुळे आमचे लक्ष विचलित होईल आणि आम्ही अन्य मुद्द्यांवर बोलू असे भाजपाला वाटते. भाजपाकडून सध्या सुरू असलेल्या प्रचारातून त्यांचा खरा रंग समोर आला आहे. अशा प्रकारच्या प्रचारातून तुमचे महिलांविषयी कसे विचार आहेत, हेच समोर येते,” असे श्रीनेत म्हणाल्या होत्या.

दरम्यान, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात तणाव असल्याच्या प्रचाराचा भाजपाला किती फायदा मिळणार? भाजपाकडून केल्या जात असलेल्या या प्रचाराला काँग्रेस कसे उत्तर देणार? खरच प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात तणाव आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp claims clash between priyanka gandhi and rahul gandhi congress leader supriya shrinate denied prd

First published on: 12-09-2023 at 21:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×