पुणे : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना पक्षात घेऊन काँग्रेसचा पुरंदर हा बालेकिल्ला अखेर भाजपने सर केला आहे. जगताप हे भाजपवासी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दोघांना पुरंदरमध्ये शह देण्याची रंगीत तालीम भाजपकडून केली जाणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
जगताप यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदार संघातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे आणि जगताप हे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचीही या भागात ताकद आहे. आतापर्यंत या मतदार संघात भाजपला शिरकाव करता आलेला नव्हता. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून साथ न मिळाल्याने जगताप हे नाराज होते. आता ते भाजपवासी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांपुढे भाजपने पहिल्यांदा आव्हान उभे केले आहे. या मतदार संघात जगताप यांना ताकत देण्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जाहीर केले आहे. जगताप यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना शह देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. भाजपच्या या राजकीय खेळीला यश येते का, हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महायुतीत संघर्ष?
पुरंदर मतदार संघात जगताप यांचे प्राबल्य आहे. त्यांचे वडील दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांच्यापासून जगताप कुटुंबाची या मतदार संघावर पकड आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीबरोबरच दूध संघ, विकास सोसायट्या, बँक या जगताप यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपला या मतदार संघात शिरकाव करण्यास आतापर्यंत फारसी संधी मिळाली नाही. शिवसेना-भाजप युतीच्या काळात हा मतदार संघ कायम शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे शिवतारे हे २००९ ते २०१४ या काळात निवडून आले. त्यांना रोखण्याचे काम जगताप यांनी पहिल्यांदा केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदार संघात ताकत आहे. १९८५ ते १९९९ या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे दादा जाधवराव हे सलग चारवेळा या मतदार संघात निवडून आले होते. २००४ मध्ये त्यांना पहिल्यांदा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक टेकवडे यांनी पराभूत केले. मात्र, त्यानंतर शिवतारे यांनी हा मतदार संघ काबीज केला. त्यांच्यापुढे जगताप यांचे कायम आव्हान राहिले आहे.
मागील चार विधानसभा निवडणुकांमध्ये जगताप आणि शिवतारे यांच्यात लढत झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे जगताप आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर दुर्गाडे यांच्यातील मतांच्या विभागणीचा फायदा शिवतारे यांना झाला. जगताप हे तिसऱ्या स्थानावर हाेते. २०१४ निवडणुकीत जगताप हे दुसऱ्या स्थानावर राहिले. २०१९ मध्ये त्यांनी शिवतारे यांना पराभूत केले. मात्र, मागील निवडणुकीत अपयश आले. आता जगताप हे भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापुढे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाल्यास या मतदार संघात जागा वाटपांवरून संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.