चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, साधन संपत्ती नाही, शिवसैनिक म्हणून अपेक्षित असा स्वभावात आक्रमकपणाही नाही. व्यक्तिमत्त्वही सर्वसामान्य, आपल्यातीलच वाटावे असे कृपाल तुमाने हे विदर्भातील पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा रामटेक लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा (२०१४ व २०१९) लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार आहेत. पक्षातील बंडाळीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपच्या मदतीशिवाय पुन्हा निवडून येऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी ते उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणार,असे सांगत होते.

१ जून १९६५ मध्ये कृपाल बालाजी तुमाने यांचा नागपूर येथे अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांचे नागपुरात झाले. घरातील आर्थिक स्थिती बेताचीच. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यावर ते बांधकाम व्यावसायिक झाले. या क्षेत्रात स्थिरावल्यावर ते राजकारणाकडे वळले. विदर्भ हा कॉंग्रेस विचारसरणीचा प्रदेश असल्याने स्वाभाविकपणे त्यांचा राजकारणात प्रवेश कॉंग्रेसमधून झाला. पण आपल्याला येथे भवितव्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर आणि ग्रामीण म्हणजे रामटेक असे लोकभेचे दोन मतदारसंघ आहेत. रामटेक हाही कॉंग्रसचा बालेकिल्लाच. पण त्याला सेनेने छेद दिला.

हेही वाचा- पक्षसंघटना टिकवण्यासाठी आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर

२००९ पर्यंत हा मतदारसंघ खुला होता. त्या आधी तीनवेळा येथून सेनेचा उमेदवार जिंकून आला होता. पण २००९ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे सेनेकडून उमेदवाराचा शोध सुरू झाला. तुमाने याच प्रवर्गातील पण हिंदू असल्याने उद्धव ठाकरे यांनी तुमाने यांना संधी दिली. तुमाने यांची पहिली निवडणूक होती. यात त्यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी केवळ १६ हजार मतांनी पराभव केला. पण पाच वर्षे मतदारसंघात कार्यरत राहिलो तर आपण पुढील निवडणूक जिंकू शकतो हा विश्वास यानिमित्ताने तुमाने यांना प्राप्त झाला. त्यानुसार त्यांनी पाच वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. ते करताना प्रत्येक लग्न समारंभ, मुलाचे बारसे, वाढदिवस, तेरावे या कार्यक्रमांवर अधिक भर दिला. त्यातून त्यांची सामान्य माणूस अशी प्रतिमा तयार झाली. त्याचा त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फायदा झाला व ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी विजय प्राप्त केला. या दोन्ही निवडणुकीत भाजप-सेना युती होती. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची मदत कशी आवश्यक आहे हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच प्रदेश पातळीवर सेना – भाजप युतीत वाद झाले तरी तुमाने यांनी मतदारसंघाच्या पातळीवर भाजप नेते व कार्यकर्त्यांसोबत दुरावा येऊ दिला नाही. पण सेना फुटल्यावर फुटीर गटाने भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका जाहीर केली.

हेही वाचा- शिवसेनेची साथ सोडण्याची माने घराण्याची दुसरी वेळ

२०२४ ची लोकसभचीे सार्वत्रिक निवडणूक भाजपच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही हे सप्ष्ट झाल्यावर तुमानेंची ठाकरे कुटुंबियांवरील निष्ठा ढळली. त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. ज्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तुमाने करतात त्या रामटेक मतदारसंघातील सहापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत आमदार आहे. जिल्ह्यातील आठपैकी एकच नगरपालिकेवर सेनेची सत्ता आहे. शिवाय लोकसभा मतदारसंघात तीन आमदार भाजपचे आहेत.त्यामुळे भाजपच्या सहकार्याशिवाय २०२४ ची निवडणूक पुन्हा जिकंता येणार नाही याचा अंदाज आल्यावरच त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याचे राजकीय चातुर्य दाखवले. तुमाने यांच्यावर अन्य नेत्यांप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. मात्र खासदार म्हणून त्यांची कामगिरी अतिशय सुमार आहे. एकही प्रकल्प ते मतदारसंघात आणू शकले नाहीत. विशेष म्हणजे ते संसदेच्या पर्यटन, दळणवळण, कोळसा खाण या महत्त्वाच्या समित्यांवर होते. पण याचा मतदारसंघांच्या विकासाला कोणताही फायदा झाला नाही. सामान्य माणूस म्हणून वागणे हे निवडणुकीत विजयासाठी प्रमुख अस्त्र ठरते हे गृहीत धरून तुमाने राजकीय वाटचाल करीत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By keeping eye on 20224 loksabha election shivsena mp krupal tumane join eknath shinde group print politics news pkd
First published on: 21-07-2022 at 10:22 IST