पिंपरी : महायुतीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असलेल्या मैत्रीत पिंपरी-चिंचवडमुळे दुरावा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत भंडारा डोंगरावरील मंदिराच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला फडणवीस येण्यापूर्वीच पवार हे मंदिराला भेट देऊन, दर्शन घेऊन निघून गेले. त्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्यात शहरात दुरावा दिसून आला.

पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले अजित गव्हाणे यांना अजित पवार यांनी मंंगळवारी स्वगृही घेतले. बुधवारी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. भाजपने या कार्यक्रमांची मोठी जाहिरातबाजी केली. त्यावर केवळ भाजप नेत्यांचे छायाचित्र वापरले. या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून अजित पवार हे उपस्थित राहतील, असे अपेक्षित होते. मुख्यमंत्री फडणवीस शासकीय कार्यक्रमासाठी शहरात आल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे त्यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहत. परंतु, बुधवारी शहरात आणि महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन असतानाही पवार यांनी पाठ फिरविली. हीच संधी साधून पवार यांचे विरोधक असलेल्या भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी शासकीय कार्यक्रमातून नाव न घेता पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले.

पालखी प्रस्थान सोहळ्याला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच पवार यांनी तुकाराम महाराजांच्या मंदिराला भेट देऊन, दर्शन घेतले आणि निघून गेले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पिंपरी-चिंचवडमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री येणार असल्याने मी पुढच्या वर्षीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणार आहे. सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पदाधिकारी निवडण्यासाठी शहराबाहेर जावे लागले नाही

बऱ्याच लोकांचे शहराच्या जडणघडणीत योगदान आहे. आम्ही ते नाकारत नाही. पण, आमचे देखील योगदान आहे. २०१७ पासून महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष करण्यासाठी पूर्वी नेत्यांकडे जावे लागायचे. आता भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना ते अधिकार दिले. त्यामुळे आम्हाला महापौर, स्थायी समिती अध्यक्ष निवडीसाठी शहराच्या बाहेर जावे लागले नाही, अशी टीका आमदार लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांकडून लांडगेंना ताकद

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीव्र विरोध करतात. भोसरीतील कामांचे उद्घाटन, लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच करण्यासाठी लांडगे आग्रही असतात. शहराचा विकास केवळ फडणवीस यांच्यामुळेच झाल्याचे सांगून पवार यांच्यावर निशाना साधतात. फडणवीस यांच्याकडून आमदार महेश लांडगे यांना ताकद दिली जात असल्याचे दिसते. त्यातूनच लांडगे यांची पवार यांच्या विरोधातील धार तीव्र होत असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.