रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यास सुरुवात झाल्यावर महायुतीतील भाजप पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लांजा, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड पाठोपाठ आता रत्नागिरी नगर पालिकेसाठी शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष वाढू लागला आहे.

शिवसेनेकडून शुक्रवारी ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने भाजपामधील इच्छुक उमेदवारांचा हिरेमोड झाला आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्याला जोरदार सुरुवात झाली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जाहीर होताच नगर पालिका व नगर पंचायतीत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे. सत्ताधारी पक्षांकडून जागा वाटपाचे काम हाती घेण्यात आल्यावर या जागा वाटपा वरुन आधीपासून भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून संघर्ष सुरु झाला आहे. जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघड उघड शिवसेनेला विरोध केल्याने या लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आता एकाएकी पडली आहे. 

लांजा येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजिनामे देत शिवसेनेचे काम करण्यास नकार दिला आहे. याबरोबर खेड नगर पालिकेसाठी भाजपने  उघड उघड शिवसेने बरोबर संघर्ष सुरु केला आहे. याठिकाणी भाजपच्या नेत्यांनी जास्तीत जास्त जागा मिळण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच चिपळूण नगर पालिका निवडणुकीत देखील भाजप शिवसेना संघर्ष पहावयास मिळत आहे. 

भाजपात प्रवेश केलेले प्रशांत यादव यांनी भाजपाच्या वाट्याला जास्त जागा मिळण्याच्या आग्रह धरला आहे. याठिकाणी देखील शिवसेना पक्षा बरोबर काम  न करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व नगर पालिकांबरोबर आता रत्नागिरी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी सायंकाळी आमदार कीरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही नावे घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात प्रभाग क्रमांक २  निमेश नायर, प्रभाग ३ साठी  राजन शेट्ये, प्रभाग ५ साठी सौरभ मलुष्टे, प्रभाग ७ साठी  गणेश भारती, प्रभाग ७ साठी  श्रद्धा हळदणकर,  प्रभाग ८ साठी  बाळू साळवी,  प्रभाग ९ साठी  विजय खेडेकर, प्रभाग १३ साठी सुहेल साखरकर,  प्रभाग १३ साठी  आफरीन होडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अशा महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत शनिवारी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात भरला.

शिवसेनेचे हे ९ आणि भाजपचे ६, असे महायुतीचे एकूण १५ उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज दाखल  केले आहेत. रत्नागिरी नगर पाकिलेसाठी उमेदवारांची घोषणा होताच  रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीतील वातावरण आता ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.  रत्नागिरी  जिल्ह्यात शिवसेनेचे दोन मंत्री असल्याने शिवसेनेला जास्त जागा मिळविण्यात  यश आले आहे. मात्र यातून मित्र पक्ष भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाल्याने जिल्ह्यात शिवसेने विरोधात वातावरण तयार झाले आहे.

याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप पक्षाच्या नाराजी नाट्यांनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलली जाण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. महायुतीतील मित्र पक्षातील अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तशा चर्चेला देखील ऊत आला आहे. मात्र उमेदवार जाहीर झाल्यावर शिवसेना व भाजप मधील अंतर्गत बंड उफाळून येवू लागल्याने याचे परिणाम निवडणुकीच्या निकालानंतरच दिसणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकाला आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.