scorecardresearch

“प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करतो, आम्ही साधू-संत नाही”; नितीन गडकरींचं विधान

“मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि…”

Nitin Gadkari
नितीन गडकरी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

२०२३-२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला मांडला आहे. या अर्थसंकल्पात करात सवलत, मोफत अन्नधान्य आणि विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रत्येक नेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्ही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही, असं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते. तेव्हा, २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नागरिकांना अर्थसंकल्पात दिलासा देण्याचा प्रयत्न केला? यावर विचारले असता गडकरींनी सांगितलं, “प्रत्येक नेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्ही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नव्हे, तर निवडणूक जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगले काम केलं, तर निवडणूक जिंकू. जो चांगलं काम करेल, लोकं त्यालाच निवडून देतात. दक्षिणेतील राज्यात मोफत वीज दिली जाते. त्यामुळे तोटा किती होतो, हे पाहिलं जात नाही.”

हेही वाचा : “प्रल्हाद जोशी संस्कृतीहीन ब्राह्मण समाजाचे नेते”, एचडी कुमारस्वामींची टीका

यावर्षी ९ राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच रस्त्याच्या प्रकल्पांच्या कामास सुरुवात झाली आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. यावर विचारलं असता नितीन गडकरींनी म्हटलं, “कोणतं असं राज्य आहे की, तिथे रस्त्यांच्या कामास सुरुवात झाली नाही. सर्व राज्यात रस्त्यांची कामं सुरु आहेत. एकाही राज्याचं नाव सांगा, जिथे रस्ते बांधले जात नाहीत.”

निवडणुकीसाठी काय लक्ष्य आहे, हे विचारलं असता नितीन गडकरींनी सांगितल, “मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि बोलतही नाही. काम करत राहतो आणि काम करतच राहिलं पाहिजे. हेच माझं लक्ष्य आहे. २०२४ च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, हे आमचं लक्ष्य आहे.”

“दिल्ली-मुंबई महामार्गाचं काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर दिल्ली ते मुंबई १२ तासांत पोहचता येईल. दिल्ली ते जयपूर २ तास, दिल्ली ते हरिद्वार २ तास, दिल्ली ते चंदीगढ अडीच तास, दिल्ली ते श्रीनगर ८ तास, कटरा ६ तास आणि अमृतसरला ४ तासांत पोहचता येणार आहे. नागपूर मधून पुण्याला ५ तासांत पोहचता येणार आहे. त्यासाठी औरंगाबादमधून महामार्गाचं काम सुरु आहे,” अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.

हेही वाचा : परवेझ मुशर्रफ यांची स्तुती करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर भाजपाने केली टीका, म्हटले…

“मुंबई-पुणे महामार्ग सुरु होण्यापूर्वी ८ विमान सुरु होती. पण, २००० साली महामार्ग सुरु झाल्यानंतर एकही विमान चालत नाही. यावर्षाच्या अखेरीस दिल्ली-जयपूर, दिल्ली-देहराडून, दिल्ली-चंदीगढ दरम्यान सुरु असलेली विमान सेवाही बंद होणार आहे. चंदीगढवरून फक्त चेन्नई, मुंबई आणि हैदराबादला विमानसेवा सुरु राहिल,” असं नितीन गडकरींनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:12 IST
ताज्या बातम्या