पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपमध्ये संघटनेच्या कार्यकारिणी निवडीवरून गटबाजी उफाळून आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीवर वर्चस्व राहावे, यासाठी सरचिटणीसपद हे समर्थकाला मिळण्यासाठी शहरातील भाजपचे चारही आमदार आग्रही आहेत. सरचिटणीसपदाचा ‘फॉर्म्युला’ अंतिम होत नसल्याने कार्यकारिणी रखडल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष निवडीनंतर तीन महिने होऊनही कार्यकारिणी जाहीर झाली नसल्याने पक्षात सारे काही आलबेल नाही हेच सिद्द होते. 

चिंचवड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शत्रुघ्न काटे यांच्याकडे १३ मे रोजी शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्या शिफारशी डावलून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने काटे यांच्याकडे शहर भाजपचे नेतृत्व सोपविण्यात आले. काटे यांची शहराध्यक्षपदी निवड होऊन तीन महिने पूर्ण होत आले, मात्र अद्यापही कार्यकारिणीला मुहूर्त मिळालेला नाही.

काटे यांचे कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आमदारांकडून सहकार्य मिळत नसल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे कार्यकारिणीवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी चारही आमदार आग्रही आहेत. आमदार ज्याची शिफारस करतील, त्याला सरचिटणीस करावे. सरचिटणीस नियुक्त करताना ‘सोशल इंजिनिअरिंग’ करावे. महिलेचाही समावेश असावा, अशी चर्चा पक्षात झाली आहे. मागील कार्यकारिणीमध्ये तीन सरचिटणीस होते. आता चार सरचिटणीस नेमताना ‘सोशल इंजिनिअरिंग’ आणि महिलेला संधी, याचा ‘फॉर्म्युला’ अंतिम होत नसल्याने कार्यकारिणीचा निर्णय झाला नसल्याचे समजते.

आमदारांच्या समर्थकाला सरचिटणीसपद दिल्यास पिंपरीत भाजपचे दोन सरचिटणीस होतील. विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन तर, चिंचवड आणि भोसरीतून एक सरचिटणीस असेल.

मुलाखतीचा फार्स’?

कार्यकारिणीला विलंब होत असल्याने शहाराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी शहर भाजपमध्ये कधीही मुलाखती घेऊन कार्यकारिणी निवडली गेलेली नाही. मात्र, काटे यांनी मुलाखतीचा ‘फार्स’ सुरू केल्याची भाजपमध्ये चर्चा आहे.

शहराध्यक्ष आणि आमदारांमध्ये मतभेद

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रारूप सुधारित विकास योजना आराखडा (डीपी) चुकीचा असून, तो रद्द करावा, अशी आमदार अमित गोरखे यांची मागणी आहे. त्यावर आपण ठाम असून, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. झपाट्याने वाढणाऱ्या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आराखडा गरजेचा असून तो लागू करावा, अशी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची भूमिका आहे. त्यातून भाजपमध्ये विकास आराखड्यावरून मतभेद असल्याचे दिसून आले.

क्षमतेनुसार कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी ३०० कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सरचिटणीस पदाबाबत आमदारांचा आग्रह नाही. त्यांना विश्वासात घेऊनच कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. लवकरच कार्यकारिणी अंतिम करून प्रदेशकडे सादर केली जाईल. त्यांची मान्यता आल्यानंतर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप