आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांच्यातील युतीची चर्चाही फिसकटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये चारही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार आप आणि काँग्रेस एकत्र लढल्यास त्याच्या ‘इंडिया आघाडी’ला फायदा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीएचा विचार केला तर २०२० मध्ये कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शिरोमणी अकाली दलने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या २५ वर्षांच्या युतीत शिरोमणी अकाली दलने पंजाबमध्ये १० जागांवर निवडणूक लढवली, तर भाजपाने तीन जागांवर निवडणूक लढवली. या तीन जागांमध्ये होशियारपूर, गुरुदासपूर आणि अमृतसरच्या जागेचा समावेश होता. मात्र, आता पंजाबमधील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्यात शिरोमणी अकाली दलचा प्रभाव म्हणावा तसा राहिलेला नाही, तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता भाजपचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे भाजपाकडून अधिक जागा मागितल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या पुनर्रचनेनंतर शिरोमणी अकाली दलाचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र, नेमकं राजकारण काय?

इंडिया आघाडीबाबत बोलायचं झाल्यास, या आगाडीतील पक्षांमध्येही जागावाटपावरून मतभेद आहेत. अशातच आम आदमी पक्षाने पंबाजमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने युती केली होती. यात त्यांना यशही मिळाले. मात्र, तरीही आपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएने एनडीएचा पराभव करत ८ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला ४५.२ टक्के मते मिळाली होती. तर याच निवडणुकीत शिरोमणी अकाली दलने ३३.९ टक्के मतांसह चार जागांवर विजय मिळवला. तसेच भाजपाला १०.१ टक्के मतांसह केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. याशिवाय चंदीगड लोकसभेची जागाही काँग्रेसने जिंकली होती.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने २४.५ टक्के मतांसह १३ पैकी चार जागांवर विजय मिळवला. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत २००९ च्या तुलनेत शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी मोठी घट झाली. याशिवाय या निवडणुकीत काँग्रेसने तीन आणि शिरोमणी अकाली दलने चार जागांवर विजय मिळवला. मोदी लाट असतानाही भाजपाला या निवडणुकीत ८.८ टक्के मते मिळाली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४०.६ टक्के मतांसह १३ पैकी ८ जागा विजय मिळवला. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाने अनुक्रमे २७.८ टक्के आणि ९.७ टक्के मतांसह प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. तर आम आदमी पक्षाला ७.५ टक्के मतांसह केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. या निवडणुकीचे सुक्ष्म विश्लेषण केले असता, असे लक्षात येते की या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जार जागांवर निर्णायक भूमिका बजावली. तर तीन जागांवर आम आदमी पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर होता.

हेही वाचा – पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीची जागा घेण्यास समाजवादी पार्टी तयार, काँग्रेस अधिक जागांची मागणी करणार?

पुढे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दणदणीत विजया मिळाला. यावेळी आपने ९२ जागांसह पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.३ टक्के मते मिळाली. तर काँग्रेस २३.१ टक्के मतांसह १८ जागा जिंकत मुख्य विरोधी पक्षा बनला. ही निवडणूक शिरोमणी अकाली दल आणि भाजपाने स्वबळावर लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अनुक्रमे तीन आणि दोन जागांवर विजय मिळवला.

विशेष म्हणजे, २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीकडे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून बघितलं. तर आम आदमी पक्षाला १३ पैकी ११ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. त्यानुसार जर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आगामी निवडणुकीत युती केली, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If aap and congress fight together in punjab india alliance will benefit know the numbers in details spb
First published on: 12-02-2024 at 20:36 IST