scorecardresearch

Premium

भाजपाच्या माजी आमदाराची ‘सेक्युलर’ कविता वगळली; गोव्यातील चित्रपट महोत्सवाला वादाची फोडणी

गोव्यामधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दैनिकामधून दिवंगत कवी, लेखक विष्णू सूर्या वाघ यांची सेक्युलर कविता वगळण्यात आली. त्यामुळे वाघ यांचे भाचे नाईक यांनी याबाबत निषेध नोंदविला. तर, आयोजकांनी हा संपादकीय विभागाचा निर्णय असल्याचे सांगितले.

Goa-Poet-Vishnu-Surya-Wagh
गोव्यातील दिवंगत लेखक विष्णू सूर्या वाघ यांच्या सेक्यूलर कवितेला इफ्फीच्या दैनिकातून अचानक वगळल्यामुळे वाद निर्माण झाला. (Photo – Siddhesh Gautam Instagram)

गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. महोत्सवाच्या काळात निघणाऱ्या ‘पीकॉक’ दैनिकामध्ये गोव्यातील दिवंगत लेखक व भाजपाचे माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांची जातिभेदावर भाष्य करणारी ‘सेक्युलर’ कविता न छापल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. रविवारी प्रकाशित झालेल्या इफ्फीच्या पीकॉक या अंकात कलाकार सिद्धेश गौतम यांनी तयार केलेले दोन पानी चित्रण छापण्यात आले आहे. मात्र, त्यासह जी कविता छापली जाणार होती, ती शनिवारी अचानक वगळण्यात आली.

या प्रकारानंतर सिद्धेश गौतम यांनी नाराजी व्यक्त केली आणि वाघ यांच्या पुतण्याने सांगितले की, हा सेन्सॉरशिप लादण्याचा प्रकार आहे. गोवा सरकारतर्फे एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ही संस्था इफ्फीचे आयोजन करीत असते. ईएसजीने सांगितले की, कविता वगळण्याचा निर्णय संपादकीय स्तरावर घेण्यात आला. ईएसजीकडे पीकॉकचे प्रकाशन करण्याचीही जबाबदारी आहे.

Sharad pawar on Nitish Kumar CM Oath
नितीश कुमार यांच्या शपथविधीवर शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “१५ दिवसांत…”
financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
Parbati Barmauh
देशातील पहिल्या महिला हत्ती माहूत आणि पद्मश्री विजेत्या पार्वती बरुआ कोण आहेत? जाणून घ्या देशाच्या ‘हस्ती कन्ये’ची कहाणी…
pune mahavikas aghadi marathi news, inauguration of water tank at gokhalenagar marathi news
पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण

“रविवारच्या अंकात विष्णू सूर्या वाघ यांची कविता छापणार नसल्याचे मला सांगण्यात आले. वाघ यांची ‘सेक्युलर’ कविता काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील अनेकांना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या जातिभेदाच्या घटनांवर या कवितेतून भाष्य करण्यात आले होते. मलाही माझ्या आयुष्यात अशा प्रसंगांचा अनेकदा सामना करावा लागला आहे. एक विद्यार्थी म्हणून नाही तर कलाकार म्हणूनही मला अडचणींचा सामना करावा लागला,” अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकून चित्रकार सिद्धेश गौतम यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.

माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही, असे सांगत गौतम यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली कविता पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर शेअर केली.

कविता न छापण्याच्या निर्णयाबाबत ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा यांनी सांगितले, “कविता न छापण्याचा निर्णय संपादकीय विभागाने घेतला होता आणि तो सर्जनशील कारणांनी घेतला होता. त्याचा कवितेच्या आशयाशी काहीही संबंध नाही. पीकॉक हा सुरुवातीपासूनच कलात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिला आहे आणि भविष्यातही आम्हाला कलेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे.”

वाघ यांचे पुतणे कौस्तुभ नाईक यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी ‘पीकॉक’कडून वाघ यांच्या सुदीरसुक्त या कवितासंग्रहातील कविता इंग्रजी भाषांतर करून त्यांना हवी आहे, असा त्यांना निरोप मिळाला. “त्यांनी मला काही कविता निवडण्यास सांगितल्या. मी त्यांना विचारले की, त्यांच्या मनात काही विशिष्ट कविता आहे का? ‘द पीकॉक’च्या रविवारच्या आवृत्तीत जातीविरोधी कलाकार सिद्धेश गौतम यांनी वाघ यांच्यावर चितारलेल्या दोन पानांच्या डिझाईनमध्ये सेक्युलर ही कविता छापण्याचे निश्चित झाले होते.”

मात्र, शनिवारी ईसीजीमधील अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि कळवले की, सदर कविता छापली जाणार नाही. कविता छापली जाणार नसली तरी गौतम यांनी डिझाइन केलेले चित्र मात्र प्रिंट करण्यात आले. गौतमनेही सांगितले की, कविता न छापण्याचे कोणतेही कारण त्याला कळविण्यात आले नाही. कदाचित वाघ यांच्या कवितेमधील व्यवस्थेविरोधातील आवाज कविता वगळण्याचे एक कारण असू शकते.

सुदीरसुक्त कवितासंग्रहामुळे २०१७ मध्येही वाद निर्माण झाले होते. जर तुम्ही हा कवितासंग्रह वाचलात तर लक्षात येईल, वाघ यांनी गोव्यातील बहुजन समाजाचा इतिहास या कवितांच्या माध्यमातून मांडला आहे. कवितांसाठी वापरलेली भाषा, कल्पना व कवितांच्या थीम या गोव्यातील साहित्य चळवळीसाठी क्रांतिकारक मानल्या जातात. त्यांच्या कविता प्रस्थापितांविरोधात भूमिका घेतात. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येलाच अशा प्रकारची सेन्सॉरशिप लावणे हे दुर्दैवी आहे, अशीही प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

वाघ यांचे बंधू रामराव वाघ म्हणाले, वाघ यांच्या कविता जातिभेद आणि बहुजन समाजाच्या व्यथा मांडतात. त्यांच्या कवितेतून विदारक सत्य मांडले जाते आणि त्यामुळेच त्यांच्या रचनेवर सेन्सॉरशिप लादली जात असेल. इफ्फीच्या कला आणि संस्कृतीसाठी वाहिलेल्या दैनिकामध्ये वाघ यांची रचना प्रदर्शित केली जात आहे, हे ऐकून मला अभिमान वाटला होता. पण एक सर्जनशील रचना रोखली गेली, याचे दुर्दैव वाटते.

विष्णू सूर्या वाघ हे ईसीजीचे माजी उपाध्यक्ष होते. २०१९ साली त्यांचे निधन झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iffi censorship row late bjp mlas poem on caste discrimination triggers controversy kvg

First published on: 28-11-2023 at 10:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×