छत्रपती संभाजीनगर : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार फेऱ्यांमध्ये शनिवारी महायुती आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमाेर आले. त्यांनी केलल्या घोषणाबाजीमुळे शहरातील क्रांती चौकाता दुपारी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन हातात देशी दारुच्या बाटल्या उंचावून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले. ‘ भिंगरी’. ‘ भिंगरी’ असे म्हणत कार्यकर्ते चिडवत होते.

संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पत्नीचे नावे दोन मद्यविक्रीचे परवाने असल्याची माहिती शपथपत्रात दिल्यानंतर भुमरे यांच्या विरोधातील प्रचाराचे प्रमुख हत्यार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तर भुमरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुस्लिमस्नेही ठरविण्यावर भर दिला होता. उमेदवारांच्या प्रतिमांवर आलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूचे कार्यकतेभिडले. पोलिसांनी व काही कार्यकर्त्यांनी वाद वाढू दिला नाही.

हेही वाचा : इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

शनिवारी सकाळी क्रांती चौकातून महाविकास आघाडीची प्रचार फेरी सुरू होणार होती. या प्रचार फेरीत विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे सहभागी झाले होते. भुमरे यांच्या मद्यविक्रीचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दोन बाटल्या हातात धरल्या. महायुतीचा उमेदवार ‘ भिंगरी विक्रेता’ असे सांगत त्यांनी ‘ भिंगरी’, ‘ भिंगरी’ असे म्हणत डिवचले. जमलेले कार्यकर्त्यांनी मग तीच घोषणा केली. भुमरे यांच्या मद्यविक्रीचे केवळ दोन नाही तर १४ परवाने आहेत आणि ते केवळ दोन वर्षात त्यांना कसे मिळाले, असा सवालही अंबदास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेतून केला होता.

एका बाजूला मद्यविक्रेता, दारुडा अशा उपमा देऊन प्रचार केला जात असताना संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्या हिंदूत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘ पूर्वी काेणी सभेत चुकून औरंगाबाद म्हटले तर खैरे त्याला संभाजीनगर म्हणा नाही तर सभेतून बाहेर काढा म्हणायचे. आता त्यांना औरंगाबाद म्हणायचे की संभाजीनगर म्हणायचे याचा संभ्रम आहे. त्यांची खरी प्रतिमा आता बाहेर येऊ लागली आहे.’ भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या निलम गोऱ्हे यांनी खैरे ही व्यक्ती ‘ डुप्लीकेट’ असल्याची टीका केली होती. खैरे यांच्या नावाचा अपभ्रंशही करण्यात आला. त्यांचे नाव मुस्लिम वाटावे असे त्यांना हिणवण्यात आले. खैरे यांची प्रतिमा मुस्लिमस्नेही करुन भुमरे यांनी प्रचार केला. विकास कामात गेल्या ३० वर्षात चंद्रकांत खैरे यांनी काही एक काम केले नाही, असेही भुमरे आवर्जून सांगत आहेत.

हेही वाचा : गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना

मुख्यमंत्री ठाण मांडून

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस प्रचारासाठी आले होते. त्यांनी अगदी बुथ कार्यकर्त्यांचीही बैठक घेतली. वैजापूर येथेही त्यांनी सभा घेतली. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारात सिनेअभिनेता गोविंदा यांनीही कन्नड येथे प्रचार फेरी काढली.