सांंगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापुर्वीच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून जिल्ह्यात जागेसाठी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्येच अधिक घमासान पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. जागा कमी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जागा वाटपानंतर संभाव्य बंडखोरी टाळण्यात पक्ष नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. विशेषत: जत, खानापूर-आटपाडी अधिक पाहण्यास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अजून अवधी असला तरी स्थानिक पातळीवरून आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे तीन, भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक असे पक्षिय बलाबल सध्या आहे. यापैकी शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खानापूर-आटपाडीचे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जाग रिक्त आहे. भाजपने जिल्ह्यातील आठही मतदार संघ जिंकण्याच्यादृष्टीने तयारी केली असून त्यादृष्टीने चाचपणी सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले यावर विधानसभेची गणिते अवलंबून राहणार असली आणि त्यावर उमेदवार निश्‍चित केले जाणार असले तरी इच्छुकांना आता घाई झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत अपेक्षित धरूनच राजकीय व्यूहरचना केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्ष आपआपल्या जागा मागून घेणारच यात शंका नाही. तीच स्थिती महायुतीची राहील असे असले तरी घटक पक्षांनीही काही जागासाठी दावा केला आहे. यामध्ये जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि संस्थापक विनय कोरे यांनी जत, मिरज व सांगली या तीन मतदार संघावर दावा केला आहे. तर खानापूर-आटपाडी हा स्व. आमदार बाबर यांचा पारंपारिक मतदार संघ असल्याने शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही राहील असे दिसते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे उमेदवारीसाठी आग्रही राहणार हे स्पष्ट असले तरी या मतदार संघात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेही आग्रही आहेत. यामुळे विधानसभेसाठी महाआघाडीपेक्षा महायुतीमध्येच जागा वाटपाचा पेच तीव्र असेल असे प्रथम दर्शनी दिसत आहे.

हेही वाचा : ‘या’ काँग्रेस नेत्याची पोस्टल बॅलेटद्वारे मतदनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली; काय आहेत कारणं?

वाळवा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक लढत झाली तरच विरोधकांना आशा आहे. मात्र, गेल्या वेळी आमदार पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले पाटील यावेळीही प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपमधीलच राहूल महाडिक, विक्रम पाटील यांनी आतापासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे विरोधकामध्ये ऐक्य घडविण्यावर पक्षाच्या वरिष्ठांना ताकद खर्ची घालावी लागणार आहे. शिराळ्यात उमेदवारीसाठी सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांच्यात चुरस राहणार आहे. तर मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांना त्यांचेच कालपरवापर्यंतचे स्वीय सहायक राहिलेले प्रा. मोहन वनखंडे हे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर मैदानात उतरण्याच्या तयारीत असले तरी स्थानिक विरूध्द उपरा असा संघर्ष आतापासूनच सुरू झाला असून आमदारकीच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रविपाटील गेल्या पाच वर्षापासून मोर्चेबांधणी करत आहेत. तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळी खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचा राजीनामा दिला असला तरी तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. पलूस-कडेगावमध्ये माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम विरूध्द जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : ओडिशातील आदिवासीबहुल भागात ‘द्रौपदी मुर्मू’ प्रचाराचा मुद्दा का झाल्या आहेत?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील हे मैदानात असतील, तर भाजपकडून खासदार पुत्र प्रभाकर पाटील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या दोन युवकांच्यातील सत्तासंघर्ष रोमाचंक पातळीवर जाण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. सांगलीमध्ये विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हॅटर्ट्रिक करण्याच्या तयारीत असले तरी भाजपमधून अन्य इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे ही मंडळी भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहतील अशी चिन्हे आहेत. तथापि, लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागतो यावर राजकीय फेरमांडणीही होउ शकते.