कर्नाटकच्या विधानसभेची निवडणूक जिंकत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. भाजपाच्या या पराभवाला तेथे काही प्रमाणात गटबाजी कारणीभूत ठरली, असे म्हटले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे दिल्लीतील नेतृत्व कर्नाटक भाजपामधील गटबाजी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असतानाच आता ही गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजपाचे सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित नव्हते. अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कर्नाटक भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र रंगवले जात आहे.

नेमकं काय घडलं?

बी. एल. संतोष यांनी बेंगळुरू येथे एक बैठक आयोजित केली होती. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्यासह अन्य नेते गैरहजर होते. भाजपातील सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक ऐनवेळी सूचना देऊन बोलावण्यात आली होती. खासदार, आमदार, विधान परिषदेचे आमदार, २०२३ साली पराभूत झालेले उमेदवार अशा महत्त्वाच्या लोकांना बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Kolhapur Election Hatkanangle LokSabha Constituency
उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची ‘मिसळ पे चर्चा’; कोल्हापूरसाठी ठरली ‘ही’ रणनीती

भाजपाचे अनेक नेते बैठकीला गैरहजर

येडियुरप्पा यांचे बैठकीला गैरहजर असणे एकवेळ ग्राह्य धरले जाऊ शकते. कारण या बैठकीच्या दिवशी त्यांचा दुसरा दौरा निश्चित होता. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कटील हे संतोष यांच्या गटातील मानले जातात. ते देखील या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. येडियुरप्पा, बोम्मई यांच्यासह आमदार आणि माजी मंत्री एस. टी. सोमाशेकर, शिवराम हेब्बर, माजी मंत्री व्ही. सोमन्ना आणि मुख्यमंत्र्यांचे माजी राजकीय सचिव रेणुकाचार्य हे देखील या बैठकीला गैरहजर होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सोमशेकर आणि हेब्बर हे भाजपावर नाराज आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये परतण्याच्या विचारात आहेत. २०१९ साली काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

भाजपामध्ये दोन प्रमुख गट

कर्नाटकमधील भाजपाचे प्रामुख्याने दोन गट आहेत. यातील एका गटाचे नेतृत्व हे येडियुरप्पा हे करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येडियुरप्पांचे राजकीय प्रस्थ कमी होत आहे. येडियुरप्पा यांचा राजकीय प्रभाव ओसरत असल्यामुळे दिल्लीतील भाजपाचे नेते चिंतेत आहेत. कारण येडियुरप्पांचा जनाधार घटल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो. भाजपाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व हे संतोष करतात. कर्नाटकमध्ये ते आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपा नेत्याचा संतोष यांच्यावर आरोप

येडियुरप्पा यांच्या अनुपस्थित बैठक पार पडल्यामुळे त्यांचे अनेक समर्थक नाराज आहेत. यातीलच रेणुकाचार्य यांनी संतोष यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संतोष यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, याच कारणामुळे ते अशा प्रकारे राजकीय खेळी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “संतोष यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित होते. येडियुरप्पा यांनी कर्नाटकमध्ये पक्षबांधणी केलेली आहे. मात्र, ते देखील बैठकीला उपस्थित नव्हते,” असे रेणुकाचार्य म्हणाले.

४०-४५ आमदार संपर्कात असल्याचा संतोष यांचा दावा

संतोष यांनी या बैठकीत केलेल्या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. काँग्रेसचे ४० ते ४५ आमदार माझ्या संपर्कात आहेत. वरिष्ठांनी परवानगी दिल्यानंतर कोणत्याही क्षणी राज्यातील कर्नाटकचे सरकार कोसळू शकते, असे ते या बैठकीत म्हणाले आहेत. तसेच लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे सध्या वाट पाहा, असेही संतोष यांनी कर्नाटकमधील भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याचे म्हटले जात आहे.

“संतोष यांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा”

संतोष यांच्या कथित विधानानंतर काँग्रेसचे आमदार जगदीश शेट्टर यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपा पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी संतोष यांनी स्वत:चा पक्ष सांभाळावा, सध्या त्यांच्याकडे असलेले आमदार त्यांच्याकडेच कसे राहतील, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला संतोष यांना दिला.

गटबाजीमुळे भाजपाचा पराभव?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाला या पक्षातील गटबाजी हे प्रमुख कारण होते, असे म्हटले जाते. ही गटबाजी निवडणुकीनंतरही वाढत गेली. त्यामुळे भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाला विधान परिषद, विधानसभेचा विरोधी पक्षनेता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ठरवण्यास अडचणी आल्या.