भाजपाची ओळख श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भारतीय जनसंघाचा उत्तराधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय सहयोगी अशी आहे. याच भाजपामध्ये मागील काही वर्षांत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि योगी आदित्यनाथ असे अनेक हिंदुत्ववादी नेते झाले. असं असलं तरी भाजपाचा जनसंघ ते मोदी युगापर्यंतचा प्रवास जवाहरलाल नेहरूंनी ठामपणे मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलू शकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी या नेत्याशिवाय होऊ शकला नसता.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे २०१८ मध्ये निधन झाले. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. नेहरूंनी मांडलेला धर्मनिरपेक्षतेचा विचार प्रभावी असताना राजकीय पटलावर आलेला भाजपा राजकीय मान्यतेसाठी संघर्ष करत होता. त्यावेळी वाजयेपींनी भाजपा पक्ष उभा करण्यात मोठं योगदान दिलं. नेहरूंनी पंतप्रधान झाल्यावर उत्तर प्रदेशातील पुराणमतवादी काँग्रेस नेते पुरुषोत्तम दास टंडन यांना बाजूला केले आणि १९५० मध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतली. देशातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये संपूर्णानंद, डी. पी. मिश्रा आणि सेठ गोविंद दास यांसारखे काँग्रेस नेते परंपरावादी होते. उत्तर भारतातील ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सरकार होते, तेथे तत्कालीन सरकारने १९५० च्या उत्तरार्धात आणि १९६० च्या सुरुवातीला गोहत्येवर बंदी घातली. इतकंच नाही, तर हिंदी भाषेला प्रोत्साहन दिलं. या काळात कधी कधी नेहरूंनी एकट्याने भारतीय धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरत हा विचार देशात रुजवण्यासाठी प्रयत्न केले.

Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य

या काळात नेहरू सरकारला आव्हान देईल इतकी जनसंघाची ताकद नव्हती. त्याकाळी उजवी विचारसरणी स्वीकारल्याने सार्वत्रिक निषेध व्हायचा. हिंदी पट्ट्यातील काँग्रेस पुराणमतवादी नेत्यांसमोर मृदू पुराणमतवादी कमी पडायचे. अशा परिस्थितीत नेहरूवादी संसदीय आचारसंहिता आणि आरएसएसच्या विचारसरणीशी घनिष्ठ संबंध असलेले अटलबिहारी वाजपेयी १९५७ मध्ये नेहरू पंतप्रधान असताना बलरामपूर येथून खासदार झाले.

vajpayee-1
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी १९ मे १९९६ रोजी पद स्विकारल्यानंतर जनतेला संबोधित करताना… (छायाचित्र – एक्सप्रेस अर्काईव्ह)

वाजपेयींचे हिंदीवर प्रभुत्व होतं. त्यांनी खूप सुत्रबद्धपणे आणि स्पष्टपणे हिंदू पुराणमतवादाची मांडणी केली. तोपर्यंत इतर कुणालाही त्यांच्या इतका स्पष्टपणे हिंदू पुराणमतवाद मांडता आला नव्हता. वाजपेयींच्या मांडणीचा प्रभाव सर्वांगीण होता. त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणूनही काम केले होते. वाजपेयींनी राजकारणासाठी आवश्यक संयमी हिंदुत्वाची मांडणी केली. नोव्हेंबर १९४८ मध्ये हिंदू महासभेने बिगर हिंदूंना सदस्य म्हणून प्रवेश नाकारल्यामुळे मुखर्जींनी हिंदू महासभेचा त्याग केला. त्याच काळात तरुण वाजपेयी नेहरूंचा प्रभाव असलेल्या भारतीय राजकारणासाठी युक्त्या शिकले.

वाजपेयी १९९० च्या दशकापर्यंत सांगत की, ते जेव्हा लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नेहरूंवर टीका करत, तेव्हा नेहरू कधीही आपला संयम सोडत नसत. त्यांनी एकदा नेहरूंवर ‘मिला-जुला व्यक्‍तित्व’ असल्याचा आरोप केला, पण त्याच दिवशी संध्याकाळी मेजवानीच्या वेळी भेट झाल्यावर नेहरूंनी वाजपेयींच्या भाषणाचं कौतुक केलं.

atal-bihari-vajpayee-vp-singh
१२ सप्टेंबर १९८९ रोजी व्ही. पी. सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी दिल्लीतील बोट क्लब येथील रॅलीत (छायाचित्र – एक्सप्रेस फोटो, आर. एल. चोप्रा)

धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून हिंदुत्वाचे जग पाहणं आणि हिंदुत्वाच्या चष्म्यातून धर्मनिरपेक्षतेचे जग पाहता आल्याने वाजपेयींना त्यात न अडकताही नेहरूवादी भाषा बोलता आली, याचा भाजपाला भविष्यात मोठा फायदा होणार होता.

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला. त्यावेळी जनसंघ, काँग्रेस (ओ), लोकदल आणि समाजवादी यांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. तेव्हा वाजपेयी परराष्ट्र मंत्री म्हणून पहिल्यांदाच सत्तेत सहभागी झाले. १९९० च्या दशकात त्यांनी संसदेत घडलेली एक घटना सांगितली होती. त्यानुसार केंद्रात जनता सरकार आल्यावर मंत्रालयाच्या कॉरिडॉरमधील नेहरूंचा फोटो काढून टाकण्यात आला. फोटो न दिसल्याने वाजपेयींनी नेहरूंचा फोटो कुठे गेला, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर नेहरूंचा फोटो परत आधीच्या ठिकाणी लावण्यात आला.

vajpayee-gandhis
१९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्लीतील वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केलं. यावेळी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी, वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा (छायाचित्र – एक्सप्रेस अर्काईव्ह/सुनिल सक्सेना)

जनता पक्षात ‘दुहेरी सदस्यत्वाच्या’ मुद्द्यावरून फूट पडली, पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेल्या अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनी १९८० मध्ये भाजपाची स्थापना केली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसला लोकसभेच्या ४०० जागा मिळाल्या. ग्वाल्हेरमध्ये माधवराव शिंदेंनी अटल बिहारी वाजपेयींचा पराभव केला, तेव्हा भाजपाला फक्त दोन जागा जिंकता आल्या.

atal-bihari-vajpayee-lk-advani
लालकृष्ण अडवाणी व अटल बिहारी वाजपेयी (छायाचित्र – एक्सप्रेस अर्काईव्ह)

भाजपातील परिवर्तन

भाजपाच्या स्थापनेनंतर दोन वर्षांत लालकृष्ण अडवाणी भाजपाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे वाजपेयी राजकीय पटलावर मागे पडले. त्याच काळात पुण्यात विनायक सावरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना अटलबिहारी वाजपेयी हसत हसत म्हणाले होते, “मला आजकाल काम नसून काम शोधत आहे. पक्षाने मला अध्यक्षपदावरून हटवले आहे. ग्वाल्‍हेरने मला लोकसभेतून बाहेर पाठवले आहे.”

अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपाने रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १९८९ मध्ये पालमपूरमध्ये ठराव मंजूर केला. अडवाणींनी १९९० मध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. त्यामुळे भाजपाला १९९० च्या दशकात निवडणुकीत यश मिळालं आणि भारतीय राजकारण दोन ध्रवी झालं. ६ डिसेंबर १९९२ रोजी अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर नेते अयोध्येत असताना बाबरी मशीद पाडण्यात आली.

बाबरी घटनेनंतर वाजपेयींचे राजकीय वनवासाचे दिवस संपले आणि त्यांना संसदेत भाजपाचा बचाव करण्यासाठी नेमण्यात आलं. त्यावेळी कुणीही बाजू घ्यायला तयार नव्हतं, अशा भाजपाच्या बचावासाठी वाजपेयींनी आपला सर्व अनुभव पणाला लावला. त्यांनी उघडपणे धर्मनिरपेक्ष भूमिका न घेताही सर्वसमावेशक भाषेत मांडणी केली. “धर्मनिरपेक्षता भारतीय लोकांच्या वर्तनात आहे. मतभेद असले पाहिजे, मनभेद नको”, अशी भूमिका वाजपेयींनी मांडली.

वाजपेयींची नेतृत्व करण्याची पाळी

१९९० च्या दशकात दूरदर्शनवर २४ तास संसदेतील घडामोडी दिसायला लागल्या. त्यावेळी महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीयांना वाजपेयींची शब्दसंपन्न हिंदी मांडणी आवडू लागली. वाजपेयींच्या सर्वसमावेशक भाषणाचे भाजप समर्थकांकडूनही कौतुक झाले. विरोधकही त्यांना एक सभ्य राजकारणी म्हणून पाहत. त्यांच्या काही विरोधकांनी तर वाजपेयींचे वर्णन चुकीच्या पक्षातील योग्य माणूस असं केलं. अडवाणींनी राजकीय ध्रुवीकरण करून भाजपाला निवडणूक जिंकून दिली, तर वाजपेयींनी पक्षाला संस्थात्मक मान्यता दिली.

१९९५ मध्ये स्वतः अडवाणींनी भाजपाचे नेतृत्व करण्यासाठी वाजपेयींच्या नावाची घोषणा केली. त्या काळात काँग्रेसची अधोगती होत होती, प्रादेशिक पक्षांना केंद्रात सत्ता वाटून घेण्याची गरज निर्माण झाली होती, ते भाजपाशी युती करण्याचे मार्ग शोधत होते. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी उत्तम चेहरा म्हणून पुढे आले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ‘बारी बारी सबकी बारी, अब की बारी अटल बिहारी’ अशी घोषणा देण्यात आली. यातून प्रत्येकाला एक एक संधी मिळते; यावेळी अटल बिहारींची संधी आहे, असा संदेश मतदारांमध्ये देण्यात आला.

vajpayee-karunanidhi
२९ ऑक्टोबर १९९८ रोजी तत्कालीन तमिळनाडू मुख्यमंत्री एम. करुणानिधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नवी दिल्लीत भेट ( छायाचित्र – एक्सप्रेस अर्काईव्ह)

अखेर वाजपेयींनी संधीचं सोनं केलं. त्यांना १९९८ ते २००४ पर्यंत दोन युती सरकारे चालवण्याचा अनुभव होता. त्या काळात त्यांनी जयललिता, करुणानिधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांशी चांगले संबंध ठेवले. त्यांनी नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेला भारतीय राजकारणाच्या केंद्रातून हटवलं आणि तेथे भाजपाला आणलं. २००४ मध्ये काँग्रेस सत्तेत परतली, तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचे घटकपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडूंचा धक्कादायक पराभव झाला आणि त्यामुळे ते खचले. वाजपेयी अखेरच्या काळात आजारी होते. ते शेवटी २००७ मध्ये त्यांच्या वाढदिवशी सार्वजनिकरित्या दिसले होते, तेव्हा पत्रकारही त्यांना भेटले होते.

वाजपेयी युग आता खऱ्या अर्थाने संपले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेची जागा हिंदुत्वाने घेतली आहे. काँग्रेसची मागील नऊ वर्षांपासून अधोगती सुरू आहे. असं असलं तरी सद्यस्थितीत विरोधी पक्षाकडे एकही वाजपेयी दिसत नाही, जो वर्चस्ववादी विचारसरणीत न अडकता तिच्याशी लढू शकेल.