Loksabha Election 2024 काँग्रेसने मंगळवारी (३० एप्रिल) चार लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. त्यात माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांना हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथून, तर अभिनेता व राजकारणी राज बब्बर यांना हरियाणातील गुडगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दोघेही काँग्रेसच्या बंडखोर ‘जी-२३’ गटातील सदस्य आहेत.

हिमाचल प्रदेशातील उना येथील काँग्रेसचे माजी आमदार सतपाल रायजादा यांना राज्यातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, ते भाजपा उमेदवार व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. महाराष्ट्रातील उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील यांची थेट लढत भाजपाचे पीयूष गोयल यांच्याशी होणार आहे.

हेही वाचा : रिक्षाचालक ते टेलर, ‘हे’ आहेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक

बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांना उमेदवारी देण्याचे कारण काय?

आनंद शर्मा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. एप्रिल १९८४ मध्ये ते प्रथमच राज्यसभेवर निवडून आले आणि चार वेळा ते संसदेच्या उच्च सभागृहाचे सदस्य राहिले. काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने जेव्हा बंडाचा झेंडा उभारून पक्षनेतृत्वाच्या बदलाची मागणी केली होती, तेव्हा या गटाचे प्रमुख सदस्य आनंद शर्मा होते. या गटाला ‘जी-२३ क्लब’ असे नाव देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधून त्यांना उमेदवारी न दिल्याने ते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते.

काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेतील पक्षाचे बहुतांश आमदार आनंद शर्मा यांच्या जवळचे आहेत. त्यांनीच शर्मा यांचे नाव मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना सुचविले आणि त्यांनी ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले. त्याशिवाय आनंद शर्मा एक ब्राह्मण चेहरा आहेत. हेदेखील त्यांना उमेदवारी देण्याचे प्रमुख कारण आहे. कारण- भाजपाने विद्यमान खासदार किशन कपूर यांना डावलून ब्राह्मण चेहरा असलेल्या राजीव भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे.

गुडगावमधून काँग्रेसने राज बब्बर यांना रिंगणात उतरवले आहे. राज बब्बरदेखील ‘जी-२३’ गटाचा भाग होते. २०२० मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी संघटनात्मक सुधारणांसाठी पत्र लिहिले होते. त्या पत्रावर राज बब्बर यांनीदेखील स्वाक्षरी केली होती. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले बब्बर एक प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी अनेक बॉलीवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. राज बब्बर तीन वेळा लोकसभेचे आणि दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस युनिटचे प्रमुखपदही सांभाळले आहे.

हमीरपूरमधून काँग्रेसने सतपाल रायजादा यांना उमेदवारी दिली आहे. रायजादा आपल्या आर्थिक, शारीरिक व राजकीय अशा सर्व प्रकारच्या शक्ती एकत्र घेऊन, काम करण्यावर विश्वास ठेवतात. उना विधानसभा मतदारसंघात जिम उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे दिले आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. सतपाल रायजादा हॉकी खेळायचे. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले पूर्ण केले आहे आणि आठ वर्षे इंग्लंडमध्ये बांधकाम क्षेत्रात कामही केले आहे.

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष भूषण पाटील यांना पक्षाने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपाचे या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ गुजराती लोकसंख्या असलेल्या भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गोयल यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे मजबूत चेहरा नसल्याने या जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास काँग्रेसने उशीर केला. शेवटी पक्षाने भूषण पाटील यांच्या नावाची घोषणा केली. भूषण पाटील हे एक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसने शिवसेना-उबाठा नेते विनोद घोसाळकर यांना काँग्रेसच्या चिन्हावर या जागेवरून निवडणूक लढविण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली.