देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गुजरातमधून भाजपाचा एक खासदार विनामतदान निवडून थेट संसदेत पोहोचला. सूरत मतदारसंघामध्ये घडलेल्या या घटनेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. तिथे काँग्रेसचे नीलेश कुंभानी, बसपाचे प्यारेलाल भारती, चार अपक्ष उमेदवार आणि इतर तीन लहान पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक प्रक्रियेबाहेर आले. त्यातील काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला; तर इतर सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अगदी थोड्या दिवसांनी इंदूर मतदारसंघामध्येही अशीच घटना घडली. तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपामध्येच प्रवेश केला; त्यामुळे तिथे प्रबळ विरोधकच उरला नाही.

याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “या दोन मतदारसंघांच्या माध्यमातून भाजपाचे चारशेपार जाण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे.” मात्र, सूरतमधील या आठ उमेदवारांनी नेमक्या कोणत्या कारणास्तव आपली उमेदवारी मागे घेतली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहतोच. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने या सर्वांशी बातचित करून त्यामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

mla s from shiv sena shinde faction complaints bjp and ncp leaders for not work in lok sabha elections
भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काम करण्यास टाळाटाळ ; शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा; फडणवीस, पवारांशी चर्चा करण्याचे आश्वासन
Mahayuti, Lok Sabha Election,
नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
Mahayuti, Lok Sabha Election,
नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
Why was Bharatiya Janata Party defeated in a stronghold like Vidarbha
विश्लेषण : विदर्भासारख्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव का झाला?
Pratap Hogade, smart meter,
स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी ! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी – प्रताप होगाडे
loksatta anvyarth How will the problem of OBC reservation be solved
अन्वयार्थ: ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा?
AAP also accused in Delhi liquor scam But can an entire political party be accused in a case
दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘आप’ही आरोपी… पण एखाद्या प्रकरणात संपूर्ण राजकीय पक्षच आरोपी होऊ शकतो का?
Rules for political parties to use state funded media during polls Sitaram Yechury G Devarajan
“मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?

हेही वाचा : रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका

१. प्यारेलाल भारती (५८)

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरवल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे प्यारेलाल भारती हेच एक प्रबळ विरोधक उरले होते. त्यामुळे गुजरातमध्ये युती केलेल्या काँग्रेस आणि आप पक्षाने त्यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले होते. मात्र, आपण उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करून त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्यारेलाल भारती ‘श्रमिक शक्ती’ नावाचे एक वृत्तपत्र चालवतात. आपण दहावी उत्तीर्ण असून आपल्याकडे फक्त ५००० रुपये रोख रक्कम असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे.

भारती यांनी याआधीही निवडणुका लढवल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी नवसारीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी २०२१ मध्ये खटोदरा प्रभागातून सूरत महानगरपालिकेची; तर २०२२ मध्ये वरछा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बसपाचे सूरतचे अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी म्हटले की, “काँग्रेसचे उमेदवार कुंभानी यांचा अर्ज बाद ठरवला गेल्यानंतर काहीतरी चुकीचे घडत असल्याची शंका पक्षाला आली होती. आम्ही भारती यांना मतदारसंघापासून दूर बडोद्यामध्ये पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी पाठवले. त्यांना आपला मोबाइल बंद करून ठेवण्यासही सांगितले. मात्र, त्यानंतर भारती कुठे गायबच झाले. त्यानंतर त्यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांनीही आमचे फोन उचलले नाहीत.” अद्यापही भारती अथवा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नसल्याचे ते सांगतात. सध्या त्यांचे भाड्याचे घरही बंद असून ते त्यांच्या मूळ गावी वाराणसीला गेल्याचे सांगितले जाते.

२. भारतभाई प्रजापती (५०) :

गेल्या तीस वर्षांपासून ते सूरतच्या हिरे उद्योगामध्ये काम करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेले असून महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतात. त्यांच्याकडे तीस हजार रुपये रोख रक्कम आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने संपर्क साधल्यानंतर भारतभाई यांनी म्हटले की, राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याचा विचार केला होता. ते म्हणाले की, “मी टीव्ही आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून राजकारणाच्या बातम्या पहायचो; तेव्हा मलाही निवडणूक लढवावीशी वाटायची.”

पुढे ते म्हणाले की, “मी अपक्ष म्हणून सूरत लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. मला वाटले होते की, माझा अर्ज बाद ठरवला जाईल; मात्र तो स्वीकारला गेला. ही निवडणूक मी कशी लढवणार, असा विचार करून मला नैराश्य आले. माझा रक्तदाबही कमी झाला आणि मी आजारी पडलो. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले.”

३. किशोर दयानी (४५) :

पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे किशोर दयानी हे शेअर मार्केटचे दलाल म्हणून काम करतात. अपक्ष म्हणून त्यांनी सूरत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता अकरावीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले असून त्यांच्याकडे ७.४८ लाख रुपये रोख रक्कम आहे.

ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, “सामान्य माणसाचे मुद्दे उपस्थित करणारा कुणीतरी उमेदवार हवा, म्हणून मी अर्ज भरला होता.” उमेदवारी मागे घेण्याबाबत ते म्हणाले की, “भाजपा नेत्यांबरोबरच माझ्या समाजाचे काही लोक माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून इतर सर्व उमेदवारांनीही माघार घेतली आहे. जर मी माघार घेतली नाही तर विनाकारण निवडणूक होऊन सरकारचे लाखो रुपये खर्च होतील.” पुढे दयानी यांनी असे म्हटले की, “निवडणुकीच्या रिंगणात टिकून राहण्यासाठी काँग्रेसने मला संपर्क साधत पाठिंबाही दिला होता. मात्र, मीही विचार केला की, सरकारचे लाखो रुपये कशाला खर्च करायचे? म्हणून मी माघार घेतली.”

पुढे ते म्हणाले की, “लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधक असायला हवा, असे मला वाटते. म्हणूनच मी विजयाची शक्यता कमी असलेल्या पक्षालाच माझे मत देतो. मी पुढील विधानसभेच्या तसेच लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा उतरणार आहे.”

४. सोहेल शेख (३१) :

सोहेल शेख हे गोपीपुराचे रहिवासी असून ते जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’कडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले असून त्यांच्याकडे ६० हजार रुपये रोख रक्कम आहे.

निवडणुकीमध्ये रस असल्याकारणाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे शेख यांनी म्हटले. ते म्हणाले की, “नंतर माझ्या मनात हा विचार आला की, फार कमी जणांचा पाठिंबा असताना मी निवडणूक कशी लढवणार? त्यामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा कमी झाल्यामुळे मी माघार घेतली.”

५. जयेश मावेदा (५४) :

सय्यदपुरा तुकीचे रहिवासी असलेल्या जयेश मावेदा यांनी ‘ग्लोबल रिपब्लिकन पार्टी’कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून ते एक साप्ताहिक चालवतात. त्यांच्याकडे पाच हजारांची रोख रक्कम असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, “मी वंचितवाणी नावाचे साप्ताहिक चालवतो; त्यामुळेच निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर इतरही अनेकांनी माघार घेतली. त्यामुळे मी देखील माघार घेण्याचे ठरवले. मला याबाबत अधिक काही बोलायचे नाही.”

६. बरैया रमेश (५८) :

वरछाचे रहिवासी असलेल्या बरैया रमेश यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यांचे ५.५४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. त्यांच्याकडे ७० हजार रोख रक्कम आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, “मी २०१७ आणि २०२२ साली करंजमधून विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्येही सूरत लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळची निवडणूक थोडी कठीण होती. मला माघार घ्यायची नव्हती; मात्र काँग्रेस आणि इतर उमेदवारांची परिस्थिती पाहता मलाही माघार घ्यावीशी वाटली.”

पुढे ते म्हणाले की, “मी काँग्रेसच्या नेत्यांना संपर्क साधून पाठिंबा मागायचा प्रयत्न केला होता. जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर मी निवडणूक नक्कीच लढवली असती.”

हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

७. अब्दुल हमीद खान (५२) :

मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे अब्दुल खान हे गेल्या २० वर्षांपासून सूरतमध्ये राहतात. ते इंटेरिअर डेकोरेशनचे काम करतात. त्यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल पार्टी’कडून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता सातवीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४.७५ लाख रुपये असून त्यांच्याकडे पाच लाख रुपये रोख रक्कम आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, “मी सूरतमध्ये आल्यापासून खूप कष्ट करून भरपूर पैसे कमावू शकलो. मला राजकारणात रस आहे, त्यामुळे मी सूरतमधून लढण्याचा निर्णय घेतला. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव मी उमेदवारी मागे घेतली. मला ते कारण सांगायचे नाही.” उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अब्दुल हमीद खान यांचा भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबरचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

८. अजित सिंह उमत (३९) :

जहांगिरपूराचे रहिवासी असलेल्या अजित सिंह यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी खासगी संस्थेत नोकरी करत असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करूनही ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही.