गेल्या दशकभरात दिल्लीतील सातपैकी एकही जागा न जिंकलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने यंदाच्या निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (२४ फेब्रुवारी) दोन्ही पक्षांतील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार दिल्लीतील सातपैकी आम आदमी पक्ष चार, तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढेल.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली अशा चार जागांवर निवडणूक लढेल, तर काँग्रेस उत्तर पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदणी चौक या तीन जागांवर निवडणूक लढणार आहे. दोन्ही पक्षांनी ज्या प्रकारे जागांची निवड केली आहे, त्यासाठी उमेदवारांची जिंकण्याची क्षमता आणि सामाजिक समीकरण याशिवाय विविध घटकांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते.

हेही वाचा – …म्हणून वडोदरा पोलिसांनी इस्लामिक धर्मगुरूला पुन्हा केली अटक, कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी?

याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे मतदार हे जवळपास एकसारखेच आहेत. यासंदर्भात बोलताना आम आदमी पक्षाचे नेते म्हणाले, ”गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा तोटा आम्हाला सहन करावा लागला. आम्हाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यावेळी आप आणि काँग्रेसची मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाला. मात्र, आता आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यंदा आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने जागावाटपादरम्यान त्यांच्या सरकारने पाच वर्षात केलेली कामं, त्यांच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारावर जागांची मागणी केली, तर काँग्रेसने अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मतदारांना डोळ्यासमोर ठेवत जागांची मागणी केली.

यासंदर्भात बोलताना आपचे नेते म्हणाले, ”सुरुवातीला काँग्रेसने २०१९ लोकसभा निवडणुकीतील प्रदर्शनानुसार आम्हाला दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आम्ही त्यांच्याकडे पाच वर्षात केलेली कामे, आमच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा, आपने दिल्लीत स्थापन केलेली सत्ता आणि केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारावर आणखी जागांची मागणी केली. त्यानुसार आम्ही चार आणि काँग्रेस तीन असे जागावाटप निश्चित केले.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी आपने काँग्रेसबरोबर युती करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसकडून ज्या जागांवर दावा केला जात होता, त्यामुळे जागावाटप निश्चित होत नव्हते. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने काँग्रेसला उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली आणि चांदणी चौक अशा तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नव्हता.

यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते म्हणाले, ”आपने दिल्लेला प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता, कारण आपने ज्या तीन जागांचा प्रस्ताव आम्हाला दिला होता, त्यापैकी उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली हे उत्तर प्रदेशच्या शेजारी आहेत. त्यामुळे या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव आहे. अशावेळी दोन्ही जागांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे अवघड गेले असते.

हेही वाचा – अखिलेश यादवांचा अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभाग, काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न; उत्तर प्रदेशात ‘इंडिया आघाडी’ला यश मिळणार?

मागील निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर भाजपाचा विजय झाला होता. या निवडणुकीत भाजपाला ५६ टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली होती, तर काँग्रेसला २२ टक्के आणि आम आदमी पक्षाला १८ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त मते मिळाली होती. काँग्रेस नेते ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले, आमच्याकडे भाजपाला चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या जागांवर कडवी टक्कर देण्याची क्षमता आहे. या जागांवर आम्ही भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या कोणत्याही नेत्याला उमेदवारी देऊ शकतो.

आपचे नेते म्हणाले, नवी दिल्ली हा स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आम्ही भाजपासाठी मोठं आव्हान उभं करू शकतो. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात, हे कर्मचारी जुन्या पेंशनच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर नाराज आहे. याशिवाय इतर तीन मतदारसंघातही आम्हाला स्थानिकांचा प्रचंड पाठिंबा आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. तसेच मनीष सिसोदिया यांच्या विरोधातील कारवाईमुळे जनतेमध्ये नाराजी आहे, त्यामुळे यंदा दिल्लीत भाजपासाठी आव्हानात्मक परिस्थिती असेल.