तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आहेत. या आरोपांनंतर लोकसभेच्या नैतिकता समितीने त्यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यांची पाठराखण केली नव्हती. मात्र, आता तृणमूल काँग्रेसने मोईत्रा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी सोपवण्याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते तथा खासदार अभिषेक बॅनर्जी मोईत्रा यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आले आहेत.

महुआ मोईत्रा यांच्यावर नवी जबाबदारी

तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांच्यावर कृष्णानगर या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबादारी आल्यानंतर मोईत्रा यांनी तृणमूल काँग्रेस तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना “मी आमच्या पक्षाचे तसेच पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे आभार मानते, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आता लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी त्यांच्या विश्वासापेक्षा जास्त काम करेन, असा मला विश्वास आहे. माझ्यासाठी बूथ वर्कर्स फार महत्त्वाचे आहेत. कारण ते आमच्या पक्षाचा कणा आहेत”, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.

Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट
Ajit Pawar, khadakwasla, Baramati lok sabha,
बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…

कॅश फॉर क्वेरी प्रकरणावर मोईत्रा यांची प्रतिक्रिया

मोईत्रा यांना लोकसभेच्या नैतिकता समितीने केलेल्या निलंबनाच्या शिफारशीवरही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना “भाजपाकडून अफवा पसरवल्या जात आहेत, भाजपाचा हा प्रचाराचा एक भाग आहे. माझा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास राहिलेला नाही, अशी अफवा पसरवण्यात आली. मात्र, भाजपाने तशी अफवा पसरवली म्हणून आम्हाला त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला असून याचा मला खूप आनंद आहे. मी माझ्या नेत्या आणि पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करेन”, असे स्पष्टीकरण मोईत्रा यांनी दिले.

अभिषेक बॅनर्जी यांनी केली पाठराखण

मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी या प्रकरणावर आतापर्यंत थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. मोईत्रा यांची पाठराखण करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. आता मात्र मोईत्रा यांच्याकडे कृष्णानगर जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे भाचे तसेच तृणमूल काँग्रेसमधील द्वितीय क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रा यांची पाठराखण केली आहे.

अभिषेक बॅनर्जी पाठिंबा देणारे पहिलेच वरिष्ठ नेते

तृणमूल काँग्रेसने अनेक जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. याच निवड प्रक्रियेत मोईत्रा यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबतची घोषणा होण्याआधीच अभिषेक बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची पाठराखण केली होती. अभिषेक बॅनर्जी हे मोईत्रा यांची पाठराखण करणारे तृणमूल काँग्रेसचे पहिलेच वरिष्ठ नेते आहेत.

अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?

“महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी केली पाहिजे, अशी भूमिका केंद्र सरकार तसेच लोकसभेच्या नैतिकता समितीने घेतली आहे. मोईत्रा यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना तसेच चौकशी करण्याची गरज व्यक्त केलेली असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का केली जात आहे? मला वाटते, महुआ मोईत्रा एकट्याने लढू शकतात. ते माझादेखील अनेक वर्षांपासून छळ करत आहेत, ही त्यांची पूर्वीपासूनची रणनीती आहे”, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

“मोईत्रा यांना लोकसभेसाठी पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता”

दरम्यान, मोईत्रा यांच्यावर कृष्णानगर जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली. “महुआ मोईत्रा यांना पाठिंबा देण्यावरून पक्षात संभ्रम आहे, असे आम्हाला वाटले होते. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची पाठराखण केल्यानंतर पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे, हे स्पष्ट होते. मोईत्रा यांची फक्त पाठराखण केली जात नाहीये, तर त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जातोय. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मोईत्रा यांना कृष्णानगर या मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे”, अशा भावना या नेत्याने व्यक्त केल्या.