BJP replaced Manohar Lal Khattar लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, हरियाणातील भाजपा-जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांचीही आघाडी तुटली आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने कुरुक्षेत्राचे खासदार नायब सैनी यांना नवे मुख्यमंत्री केले आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खट्टर यांनी स्वतः भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

पंतप्रधानांकडून खट्टर यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुग्राममधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री खट्टर यांची भरभरून प्रशंसा केली होती. राज्याच्या विकासासाठी खट्टर यांच्या दूरदृष्टीचेही कौतुक केले होते. खट्टर जुने मित्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी जुने काही किस्सेदेखील सांगितले होते. मोदींनी सांगितले की, ते खट्टर यांच्या मोटारसायकलवरून फिरायचे. अनेकदा रोहतक ते गुरुग्राम असा प्रवास करायचे. “तेव्हा रस्ते छोटे होते, पण आज संपूर्ण गुरुग्राम प्रदेश अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी जोडला गेला आहे; ज्यात एक्सप्रेस वेचादेखील समावेश आहे. या प्रगतीतून मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी दिसते. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील प्रत्येक नागरिकाचे भविष्य सुरक्षित आहे,” असे पंतप्रधान म्हणाले होते.

CM Eknath Shinde criticizes to Congress leader Rahul Gandhi
मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “आईच्या पदराला धरुन राजकारण…”
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

खट्टर यांनीही मोदींना आश्वासन दिले होते की, “हरियाणातील २.८२ कोटी लोकांच्या वतीने मी खात्री देतो की, भाजपा हरियाणातील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकेल.” जानेवारीमध्ये, योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडिओ संवाद साधतानादेखील पंतप्रधानांनी खट्टर यांचे वर्णन “बहुत मजबूत आदमी (अतिशय मजबूत व्यक्ती)” असे केले होते.

खट्टर यांना हटवण्याचे कारण काय?

भाजपाच्या सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, खट्टर यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. खट्टर दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. दोन टर्मनंतर मुख्यमंत्री बदलण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे, हा निर्णय पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे दिल्लीतील भाजपा नेत्याने सांगितले. “निवडणुकीसाठी पक्षाला नवीन नेतृत्वाला संधी द्यायची आहे. खट्टर हे उत्तम संघटक, उत्तम प्रशासक असून त्यांची प्रतिमा अगदी स्वच्छ आहे. पक्षाला कोणतीही तक्रार नाही. नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचा भाजपाचा नेहमीच प्रयत्न असतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,” असे हरियाणातील पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्षाला लोकसभा निवडणुकीत सर्व १० जागा जिंकण्याचा विश्वास आहे. परंतु विधानसभा निवडणूक पक्षासाठी चिंतेचा विषय आहे, असे भाजपाच्या अंतर्गत सूत्रानी सांगितले. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. “हरियाणात लोकसभा निवडणूक भाजपासाठी अवघड नाही, कारण राज्यातील सर्व ३६ समुदायांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे आणि या समुदायांचा त्यांना पाठिंबाही आहे,” असे एका नेत्याने सांगितले. ते असेही म्हणाले की, शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अडचण ठरू शकतो.

मनोहर लाल खट्टर यांचा कार्यकाळ

खट्टर यांनी २०१४ मध्ये हरियाणातील कर्नालमधून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पदाची शपथ घेऊन ते हरियाणामधील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. २०१९ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. २०१४ मध्ये, हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत ९० सदस्यांच्या विधानसभेत ४७ मतदारसंघ जिंकून इतिहास रचला होता.

खट्टर यांना त्यांच्या साडेनऊ वर्षांपेक्षा अधिकच्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ते मुख्यमंत्री असताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. २०१६ मध्ये जाट आरक्षण आंदोलनादरम्यान ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला २०१७ मध्ये पंचकुला येथील सीबीआय कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यानंतर राम रहीमच्या अनुयायांमध्ये संघर्ष झाला; ज्यामध्ये ४० हून अधिक लोक मारले गेले. २०१८ मध्ये धार्मिक नेता रामपालला अटक झाली. त्यावेळी किमान सहा लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २०२०-२१ चे शेतकरी आंदोलन, नूहमध्ये गेल्या वर्षी झालेला जातीय हिंसाचार आणि सध्या सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन, अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाल्या. मात्र भाजपा नेतृत्वाच्या पाठिंब्याने खट्टर विजयी झाले.

२०१९ मध्ये, खट्टर यांनी हरियाणातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत लोकसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले. हरियाणात सुरू करण्यात आलेल्या ‘परिवार पहचान पत्र’ आणि ‘स्वामित्व’ योजनेचे केंद्र सरकारकडून कौतुक करण्यात आले होते. ‘स्वामित्व’ योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील घरमालकांना त्यांचे हक्क प्रदान करणे आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘लाल डोरा’ म्हणतात. ही योजना २०२१ मध्ये हरियाणामध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी केंद्रानेही या योजनेची सुरुवात केली.

२०२१ मध्येही मोदींनी खट्टर यांची प्रशंसा केली होती, “मुख्यमंत्री म्हणून ते समर्पण भावनेने काम करतात. अगदी केंद्र सरकारनेही हरियाणा सरकारच्या काही जनहितकारी कार्यक्रमांचा स्वीकार केला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यावेळीदेखील खट्टर यांची बदली होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, कारण भाजपाने उत्तराखंड आणि गुजरातमधील मुख्यमंत्र्यांची बदली केली होती.

हेही वाचा : ममता बॅनर्जी विश्वासघातकी; काँग्रेसची टीका

झज्जर येथे एका कार्यक्रमात मोदी म्हणाले होते, “हरियाणाला अनेक दशकांनंतर मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करणारे सरकार मिळाले आहे. राज्याच्या उज्वल भविष्याचा रात्रंदिवस विचार करणारे सरकार मिळाले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले होते.