भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या दोन दशकांच्या राजकारणात सलोख्याचे संबंध ठेवत डोंबिवलीतील आपले राजकीय बस्तान युतीच्या राजकारणात पक्के करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण अलिकडे मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्या कुरघोड्यांमुळे मात्र अस्वस्थ होते. मंत्री असूनही शहराच्या महापालिकेत आपल्या आणि समर्थकांच्या विकासकामांच्या नस्तींवर चढणारी धुळ पाहून चव्हाणांची अस्वस्थता टोकाला पोहचली होती. केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचा ध्यास असला तरी कल्याणात डाॅ.शिंदे यांच्यासाठी जीव झोकून काम करायची मात्र अजिबात इच्छा नाही असा जाहीर सुर चव्हाणांचे समर्थकही लावताना दिसायचे. शिंदे आणि चव्हाणांमधील मागील तीन-साडेतीन वर्षातील ही टोकाची कटुता गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून मात्र अचानक कमी होऊ लागली असून दिवाळीच्या तोंडावर तर वेगवेगळ्या विकासकामांच्या निमीत्ताने हे दोन नेते एकाच बॅनरवर झळकू लागल्याने एरवी एकमेकांच्या नेत्यांविरोधात कंठशोष करणाऱ्या समर्थकांचे चेहरे मात्र पहाण्यासारखे झाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे राजकीय समिकरण अस्तित्वात आले आणि नगरविकास विभागाची सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आली. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याची संपूर्ण सुत्र शिंदेकडे सोपवली होती. मुंबई आमची ठाणे तुमचे अशापद्धतीने ठाकरे-शिंदे यांचे सत्तेचे गणित ठरले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार तेव्हापासूनच सुरु झाला होता. नगरविकास विभागाची सुत्र असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभारही शिंदेच्या इशाऱ्यावर सुरु झाला. नेमकी ही संधी साधत खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात एकहाती वर्चस्व स्थापण्यास सुरुवात केली. मंत्री असूनही कळवा-मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना घेरायचे, ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटीलांना फेस आणायचा, डोंबिवलीत संघाच्या मैदानातच रविंद्र चव्हाण यांच्यावर कुरघोडी करायची एकही संधी खासदार शिंदे यांनी सोडली नाही. पुढे राज्यातील राजकारण बदलले आणि थेट मुख्यमंत्री पद शिंदे यांच्याकडे आले. भाजप सत्तेत सहभागी झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक रविंद्र चव्हाण हेदेखील मंत्री झाले. सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी खाते त्यांच्याकडे आले. आता आपल्याला अच्छे दिन येतील म्हणून खुशीत असलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर शिंदेशाहीच्या बळकटीकरणामुळे मात्र जुनेच दिवस बरे होते असे म्हणायची वेळ आल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे शाखा बचाव आंदोलन, उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात

टोकाचा वाद

राज्यातील सत्तातरणानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे आणि चव्हाणांमध्ये अनेकदा जाहीर द्वंद्व पहायला मिळाले. डोंबिवली पुर्व भागाचे पक्षाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधातील गुन्ह्यामुळे हे वितुष्ट टोकाला पोहचले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाउसाहेब दांगडे यांना खासदार शिंदे यांनी महापालिकेत आणले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामांकडे दांगडे ढुंकूनही पहात नाहीत असा जाहीर आक्षेप कल्याण पुर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला. मंत्री चव्हाणांचे समर्थकही जाहीरपणे हाच सुर आळवत होते. केंद्रात मोदी हवेच पण त्यासाठी मुख्यमंत्री पुत्राचे काम करावे लागणार या विचारानेच चव्हाण समर्थक नाक मुरडताना दिसत होते. चव्हाण यांचा सुमारे ३७१ कोेटी रुपयांचा डोंबिवलीतील रस्ते कामाचा निधी शिंदे पिता-पुत्रांनी रोखून धरला होता असे त्यांचे समर्थक जाहीरपणे बोलायचे. तर डोंबिवलीत चव्हाण यांचे विकासकामात योगदान काय ? असा सवाल खासदारांचे समर्थक उपस्थित करताना दिसत. डोंबिवलीत हजार कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन करताना खासदार शिंदे यांनी चव्हाण यांना दुय्यम स्थान दिले होते. चव्हाण यांच्यामार्फत यंदा वातानुकुलीत मंडपात गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी होणारा विजेचा पुरवठाही यंदा तोडण्यात आला. तेव्हा संतापलेले चव्हाण यांनी आपण ठरविले तर संबंधितांना धडा शिकवू असा इशारा दिला. शकतो, असा इशाराही मंत्री चव्हाण यांनी दिला होता. हा वाद सतत टोकाला जात असताना गेल्या काही दिवसांपासून मात्र या दोन्ही नेत्यांची मनोमिलनाची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा… राज्यातील समाजवाद्यांमध्येच फूट

मनोमिलनाची दिवाळी

असा शत्रुत्वाचा सूर टिपेला पोहचला असताना अचानक चव्हाण आणि खासदार शिंदे हे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ठाणे, डोंबिवलीत फलकांवर विकासकामांच्या नावाखाली एकत्र झळकू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चव्हाण यांची मुंबईत एकत्रित बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीनंतर आठवडाभरातच चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांच्या कामाच्या नस्ती धुळीच्या गठ्यांमधून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. डोंंबिवलीत डिजिटल ॲकेडमी सुरू झाली. रेल्वे स्थानकाच्या भोवती शहरातील नामवंतांची माहिती देणारा एक प्रकल्प चव्हाण सुरु करत आहेत. या प्रकल्पाचा शुभारंभला खासदार शिंदे खास निमंत्रीत असतील. एरवी चव्हाणांविरोधात आक्रमक दिसणारे खासदारांचे डोंबिवलीतील समर्थकही हल्ली बदलत्या वाऱ्यांची दिशा ओळखून मौनात गेले आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना त्यापुर्वी आलेली ही दिवाळी डोंबिवलीकरांसाठी राजकीय मनोमिलनाची ठरु लागली आहे हे मात्र निश्चित.

हेही वाचा… विदर्भात अजित पवार गटाची ‘नवी वेळ’ कधी?

तशी धुसपुस नव्हतीच. दोन्ही नेते आपल्या परीने विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. आता ही कामे एकत्रित प्रयत्न करून केली जात आहेत. याचा लोकांनाही आनंद आहे.” – शशिकांत कांबळे, प्रदेश सरचिटणीस, अनुसूचित जाती जमाती विभाग, भाजप.

” राजकारणात थोडं भांड्याला भांडे लागतेच. आत्तापर्यंत जी कामे कधी डोंबिवलीत झाली नाहीत. ती कामे खासदारांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहेत. आता तर दोन्ही नेते एकत्र येऊन डोंबिवली शहराचा चेहरा बदलत आहेत. लोकांसाठी ही पर्वणी आहे.” – संतोष चव्हाण, सचिव, डोंबिवली शहर शिवसेना.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister ravindra chavan and member of parliament shrikant shinde joined hands together in dombivli politics unrest among party workers in dombivali print politics news asj
First published on: 10-11-2023 at 15:48 IST