लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीची तयारी आतापासूनच केली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे द्वितीय क्रमांकाचे नेते तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पराभवासाठी भाजपासह, काँग्रेस आणि सीपीआय (एम) या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असतानाच आता इंडियन सेक्यूलर फ्रन्ट (आयएसएफ) पक्षाचे आमदार नौशाद सिद्दीकी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

“अभिषेक बॅनर्जी यांना पराभूत करू शकतो”

नौशाद सिद्दीकी हे आयएसएफ या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. या पक्षाने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी युती करून एकूण तीन जागांवर निवडणूक लढवली होती. यातील फक्त एका जागेवर नौशाद यांच्या रुपात आयएसएफ या पक्षाचा विजय झाला होता. नौशाद यांचा मुस्लिमांवर प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघाविषयी भाष्य करताना “मी अभिषेक बॅनर्जी यांना पराभूत करू शकतो. मला त्या मतदारसंघातील लोकांचा पाठिंबा आहे. लोक मला खासदार म्हणून निवडतील आम्ही अभिषेक बॅनर्जी यांना घरी पाठवतील,” असे नैशाद म्हणाले. सिद्दीकी यांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगार मतदारसंघातून विजय मिळवला होता. हा प्रदेश तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र नौशाद यांनी या मतदासंघातून विजयी कामगिरी केली होती.

Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Amethi Lok Sabha Election 2024
अमेठीमधून कोण निवडणूक लढवणार? राहुल गांधींनी वाढवला सस्पेन्स; म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे…”
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

नौशाद यांचा मुस्लीम मतदारांवर प्रभाव

भांगार विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास हा मतदारसंघ लोकसभेच्या डायमंड हार्बर या मतदारसंघाच्या अंतर्गत येत नाही. मात्र हा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा या जिल्ह्याचा भाग आहे. या जिल्ह्यातील साधारण ३५.५७ टक्के मुस्लिमांवर नौशाद यांचा प्रभाव आहे. एकट्या डायमंड हार्बर या मतदारसंघात साधारण ५३ टक्के मतदार हे मुस्लीम समाजाचे आहेत.

“अभिषेक बॅनर्जी यांचाच विजय होईल”

पंचायत निवडणुकीत आयएसएफ पक्षाला भांगार विधानसभा मतदारसंघातील मुस्लीम मतदारांची भरपूर मते मिळाली होती. या निवडणुकीच्या माध्यमातून या पक्षाने मुस्लीम मतदारांवर त्यांची असलेली पकड दाखवून दिलेली आहे. नौशाद यांच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या भूमिकेबद्दल तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा सागरदिघी मतदारसंघाप्रमाणेच डायमंड हार्बर मतदारसंघातही राजकीय डावपेच आखू पाहात आहे. नौशाद सिद्दीकी हे कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. तसे त्यांना स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमागे भाजपाचा हात आहे. जो कोणी अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधत निवडणूक लढवेल, त्याला तेथील जनताच पराभूत करेल. नौशाद हे भाजपाचे एजंट असल्याप्रमाणे वागत आहेत,” असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले.

“नरेंद्र मोदींनी निवडणूक लढवली तरी…”

तृणमूल काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री शशी पांजा यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “बॅनर्जी यांच्याविरोधात कोण निवडणूक लढत आहे, याने काहीही फरक पडणार आहे. त्या जागेवरून तृणमूल काँग्रेसचाच विजय होईल. साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली तरी, त्यांचा पराभव होईल,” असे शशी म्हणाले.

“भाजपाचाच विजय होणार”

काही दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जी यांच्या पराभवासाठी आम्ही दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला बळ देऊ, असे पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले होते. याच विधानाचा आधार घेत नौशाद यांच्या भूमिकेमागे भाजपाचा हात असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. “नौशाद या मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर लढू द्या. आमचाच या मतदारसंघातून विजय होणार आहे,” असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.

अभिषेक बॅनर्जी यांचा ३.२० लाख मतांच्या फरकाने विजय

दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी २०१४ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी डायमंड हार्बर या मतदारसंघातून ७० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. २०१९ साली त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला ३.२० लाख मतांच्या फरकाने पराभूत केले होते. डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघ येतात. २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत या सातही मतदारसंघांत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला होता.