कोल्हापूर : लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आणि तो ४ दिवसांतच हवेत विरलाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली शिष्टाई सफल ठरल्याने ज्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत होते त्या धैर्यशील माने यांच्या प्रचारात आवाडे सक्रियही झाले. या निमित्ताने माने-आवाडे घराण्यातील तीन पिढ्यांतील वादाचे तिसरे पर्व पुढे आले आहे. मुख्यमंत्र्यांकडून आवाडे यांना काही आश्वासने मिळाले असली तरी निवडणुक काळातील आश्वासने म्हणजे बुडबुडा ठरत आल्याचा पूर्वानुभव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती अंतर्गत उमेदवारीवरून रंगतदार नाराजी नाट्य पाहायला मिळाले. महायुतीने धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने मार्च अखेरीस घेतला. त्यानंतरही नाराजी नाट्य काही संपले नाही. संजय पाटील यांनी मेळावा घेऊन माने यांच्या विरोधातील नाराजीला तोंड फोडले. तथापि, त्यांच्यासह मराठा क्रांती संघटनेचे नेते सुरेश पाटील हे शिरोळ मध्ये एका व्यासपीठावर माने यांच्या सोबत आले होते. कृष्णाकाठचा हा वाद मिटवण्यात माने यांना पहिले यश आले.

आणखी वाचा-बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?

मुख्यमंत्र्यांनी जमवले

आवाडे यांच्यासोबत जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे व शिरोळचे शिंदे सेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे असल्याचा दावा करण्यात आला होता. लोकसभा मतदारसंघात निवडणून येण्याइतकी आवाडे यांची ताकद असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. परिणामी आवाडे यांच्या उमेदवारीला रातोरात महत्व प्राप्त झाले होते. मात्र हा सारा मामला भ्रामक, तकलादू असल्याचे गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडी मधून स्पष्ट झाले. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील राजकीय जोडण्या लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यांनी आवाडे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतरही आवाडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार असल्याचे काल्पनिक चित्र उभे केले. याच रात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री जाऊन चर्चा केली. आणि दोघांनाही प्रचारात आणले. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा तातडीने प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोहोचले. आणि क्षणार्धात प्रकाश आवाडे यांचे बंड थंड झाले! लोकसभा लढणार आणि जिंकणार अशी घोषणा करणारी आवाडे यांच्या निर्धाराची तलवार मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचतात म्यान झाली. लगोलग ते माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीच्या गर्दीत मिसळूनही गेले.

आणखी वाचा-काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण

प्रकाश आवडे यांनी माघार का घेतली असा बोचरा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांचे राजकीय कार्य मोठे आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. त्यांना पुढील काळात सहकार्य राहील, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. तर प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने माघार घेणार असल्याचे नमूद केले आहे. मुळात निवडणुकीतील आश्वासने ही आळवावरच्या पाण्यासारखी ठरत आल्याचा अनुभव आवाडे यांना यांना यापूर्वी आला आहे. २००४ खासदार निवेदिता माने यांच्या बरोबरीनेच माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. दोन्ही काँग्रेस एकत्र असल्याने वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीमुळे आवाडे यांना थांबावे लागले होते. तेव्हा राज्यसभेवर नियुक्त करण्याचा शब्द त्यांना दिला होता खरे; पण पुढे तो कधी चर्चेतही आला नाही. आता पितापुत्र दोघांनी शरणागती पत्करली आहे. त्यांना काही आश्वासने दिली असली तरी ती फारशी टिकतील असेही नाही. याही आधी बाळासाहेब माने यांच्या लोकसभा निवडणुकी वेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष आमदार सा. रे. पाटील यांनी बंडखोरी केली होती. तेव्हाही आवाडे यांचे त्यांना पाठबळ होते. त्यामुळे माने आणि आवाडे कुटुंबीयात असा हा तीन पिढ्यांचा संघर्ष मागील पानावरुन पुढे सुरु आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash awades rebellion cools down chief minister eknath shinde courtesy succeeds print politics news mrj
Show comments