काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या कारवाईविरोधात केरळमध्ये ठिकठिकाणी काँग्रेसकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देत असताना केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी सांगितले की, आम्ही वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहोत.
शेकडो काँग्रेस कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केरळ राजभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रस्त्यावर तात्पुरते बॅरिकेड्स उभारली. आंदोलकांनी ही बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले.
वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा येथील पक्ष कार्यालयात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि स्थानिक आमदार टी. सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा पार पडली. या सभेनंतर बीएसएनएल कार्यालयाला घेराव घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वायनाड लोकसभा मतदारसंघातील सुलतान बाथेरी, मंथावडी आणि मुक्कोम या शहरांमध्येदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. कोझिकोड या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. .
केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार व्ही. डी. सथीशन म्हणाले, “राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. तसेच या कारवाईतून राजकीय सूडबुद्धी दिसून येते. या कारवाईविरोधात पक्ष राजकीय आणि कायदेशीर लढाई लढेल. सूरतच्या न्यायालयाचा निर्णय अंतिम नाही. काँग्रेसचा लोकशाहीवर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. या कारवाईला घाबरून राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. आम्ही केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत राहू.”
लोकसभेच्या कारवाईवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरन म्हणाले, “आम्ही पोटनिवडणुकीला घाबरत नाही. त्यांना पोटनिवडणुकीची घोषणा तर करू द्या. आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. या देशावर कुणी राज्य करावे, हे लोकच ठरवतील. जर निवडणुकीची घोषणा झाली तर आम्हाला विश्वास आहे की, लोक या संधीचा लाभ घेऊन केंद्र सरकारला उत्तर देतील. जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल, याची काँग्रेस पक्षाला पूर्ण खात्री आहे.”